कोकरुड : खुजगाव (ता. शिराळा) येथे परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याप्रकरणी वाठार (ता. कराड) येथील ठेकेदारावर शिराळा तहसीलदारांनी कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. मात्र कारवाई उशिरा केल्याने तक्रारदार किरण सावंत यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबत जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या शिराळा तालुक्यात कराड-कोकरुड आणि शिराळा-कोकरुड अशा दोन राज्यमार्गांची कामे सुरू आहेत. प्रशासनाने नियम अटी घालून कराड-कोकरूड या मार्गासाठी पाचशे ब्रास उत्खननास परवानगी दिली. मात्र संबंधित ठेकेदाराने चक्क मेणी, येळापूर, खुजगाव या गावाच्या परिसरात तब्बल ५० लाख ब्रासपेक्षा जास्त उत्खनन करून मुरुम काढला असल्याची तक्रार खुजगाव येथील रहिवाशी व युवासेनेचे राज्य विस्तारक किरण सावंत यांनी लेखी निवेदनाद्वारे शिराळा तहसीलदार यांच्याकडे १२ मार्च राेजी दिली होती. तक्रारीची दखल घेत तहसीलदार गणेश शिंदे यांनी उत्खनन केलेल्या ठिकाणी भेटी देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे तहसीलदार गणेश शिंदे यांनी ३१ मार्चला वाठार (ता. कराड) येथील गणेश मारुती माने यांना परवानगीपेक्षा जास्त अनधिकृत उत्खनन करून मुरुम काढल्याने आपल्यावर का कारवाई करण्यात येऊ नये. अशी नोटीस बजावली आहे. मात्र ठेकेदारावर पंचनामा करून तत्काळ कारवाई न करता फक्त तुमच्यावर कारवाई का करू नये, अशी नोटीस उशिरा काढल्याने किरण सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आणि मंत्री यांच्यापर्यंत ठेकेदाराविरुद्ध पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.