रेल्वेमध्ये ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:44+5:302021-03-04T04:47:44+5:30

मिरजेतून बंगळुरूला जाणाऱ्या राणी चन्नम्मा एक्स्प्रेसचे प्रवासी विनामास्क प्रवासासाठी स्थानकात आले होते. लोकमत न्यूज नेेटवर्क सांगली : देशातील विविध ...

No masks, no social distance in railways | रेल्वेमध्ये ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग

रेल्वेमध्ये ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग

Next

मिरजेतून बंगळुरूला जाणाऱ्या राणी चन्नम्मा एक्स्प्रेसचे प्रवासी विनामास्क प्रवासासाठी स्थानकात आले होते.

लोकमत न्यूज नेेटवर्क

सांगली : देशातील विविध राज्ये व शहरांत कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असले तरी रेल्वे प्रवाशांना त्याचे भान नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिरज स्थानकात देशभरातून प्रवासी येतात, त्यातील सर्रास मास्क न घालताच प्रवास करीत असल्याचे दिसून आले.

स्थानकात प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या प्रतीक्षेत बसलेल्या प्रवाशांनाही मास्कचे भान नसल्याचे दिसून आले. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचे गांभीर्य नव्हते. सांगली-मिरजेतून सध्या अत्यंत मोजक्या प्रवासी रेल्वे धावत आहेत. तिकीट कन्फर्म असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. स्थानकात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटही ५० रुपयांवर नेले आहे. तरीही प्रवाशांना कोरोनाचे भान नसल्याचे दिसत आहे. मंगळवारी दुपारी कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस व मिरज-बंगळुरू राणी चन्नम्मा एक्स्प्रेस एकाचवेळी स्थानकात होत्या, त्यामुळे प्रवाशांची गर्दी होती, पण मास्क वापरण्याबाबत बेफिकिरी दिसली. समोर पोलीस किंवा तिकीट तपासणीस दिसताच हनुवटीवरचा मास्क नाकावर चढत होता.

सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनीही याला दुजोरा दिला. प्रवासी आमच्यापुढे मास्क नाकावर चढवतात, आमची पाठ फिरताच खाली घेतात असा अनुभव त्यांनी सांगितला. देशभरातून आलेले प्रवासी मिरज शहरात, तसेच अन्य गावांत जातात, त्यामुळे हे विनामास्क प्रवासी कोरोनावाहक ठरण्याची भीती आहे. कोरोना वाढलेल्या मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांवरही कोणतेच निर्बंध नाहीत. त्यांची स्थानकातील तपासणीही आता थंडावली आहे.

मिरजेतून सध्या धावणाऱ्या गाड्या

१. मिरज-बंगळुरू राणी चन्नम्मा एक्स्प्रेस

२. कोल्हापूर - तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस

३. कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस

४. निजामुद्दीन - गोवा एक्स्प्रेस

५. कोल्हापूर - मुंबई कोयना एक्स्प्रेस

६. हुबळी - दादर एक्स्प्रेस

७. म्हैसूर - अजमेर एक्स्प्रेस

८. यशवंतपूर - अजमेर एक्स्प्रेस

९. यशवंतपूर - गांधीनगर गांधीधाम एक्स्प्रेस

१०. यशवंतपूर - जोधपूर

११. दादर - पुद्दुचेरी एक्स्प्रेस

चौकट

मास्क नाही, पण कारवाईदेखील नाही

विनामास्क प्रवाशांची स्थानकात गर्दी असली तरी त्यांच्यावर कारवाई मात्र होताना दिसत नाही. सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर हिवसे यांनी सांगितले की, यासंदर्भात आम्हाला कोणत्याही सूचना नाहीत. रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेपुरती जबाबदारी आम्ही पाहतो. रेल्वेचे तिकीट तपासणीस प्रवाशांना मास्क वापरण्याची सूचना देतात. दंडात्मक कारवाई मात्र करीत नाहीत. गेल्या आठ-दहा महिन्यांत विनामास्क प्रवाशांवर कारवाई केल्याची अधिकृत माहितीच रेल्वे अधिकाऱ्यांकडे नाही, यावरून गांभीर्य लक्षात येते. पोलिसांना पाहताच हनुवटीवरचा मास्क नाकावर जातो, हीच काय ती समाधानाची बाब!

पाॅइंटर्स

- येणाऱ्या गाड्या - ११

- जाणाऱ्या गाड्या - ११

- एकूण गाड्या - २२

कोट

मास्क नसल्यास प्रवाशांना स्थानकात प्रवेश देत नाही, त्याचबरोबर रेल्वेतून उतरणाऱ्या बाहेरील प्रवाशांनाही मास्क घातल्याशिवाय स्थानकात उतरू देत नाही. प्रसंगी त्यांच्यावर तिकीट तपासणीसाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

- व्ही. पनीरसेल्वम, स्थानक अधीक्षक.

Web Title: No masks, no social distance in railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.