सांगली : वृत्तपत्र विक्रेत्यांचे यंदाचे राज्य अधिवेशन वर्धा येथे दि. २६ व २७ जानेवारीस आयोजित केले आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी दिली.
अधिवेशनाच्या तयारीसाठी राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली. सरचिटणीस बालाजी पवार, गोरख भिलारे, विकास सूर्यवंशी, दत्तात्रय घाटगे आदी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतला. अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया न्यूजपेपर डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक राकेश पाण्डेय यांच्याहस्ते होईल.
पाटणकर म्हणाले, वर्धा परिसरात कोरोनाची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात नसल्याने उपस्थितांची संख्या मर्यादित असेल. शासकीय नियमांचे पालन करीत अधिवेशन पार पडेल. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे.
बालाजी पवार म्हणाले, अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्याचा विचार सुरू आहे. प्रक्षेपणाचे नियोजन स्थानिक पातळीवर करण्याचे प्रयत्न आहेत. फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपणाचे नियोजन आहे.
विकास सूर्यवंशी, दत्ता घाडगे यांनीही चर्चेत भाग घेतला. कोषाध्यक्ष गोरख भिलारे- पंढरपूर, मारुती नवलाई- सांगली, संजय पावशे- मुंबई, विनोद पन्नासे- चंद्रपूर, रवींद्र कुलकर्णी- मालेगाव, सुनील मगर- नाशिक, संतोष शिरभाते- यवतमाळ, अण्णासाहेब जगताप- औरंगाबाद यांनीही चर्चेत भाग घेतला.
--------