सांगली : समाजाला सुखी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची गरज असल्याचे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या उपकरणांची काकोडकर यांनी पाहणी केली यावेळी ते म्हणाले की, अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास धरला पाहिजे. नवीन संकल्पना मांडून त्या विकसित करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्राध्यापक व उद्योजकांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमांना बळ दिले पाहिजे. नवनवीन उपकरणे तयार केली, तर राहणीमान उंचावणार आहे. आज अनेक यंत्रे परदेशातून आयात करत आहोत. आपण स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले, तर अद्ययावत यंत्रे बाहेरून आयात करावी लागणार नाहीत. ‘वालचंद’चे संचालक डॉ. एम. जी. देवमाने यांनी स्वागत केले. यावेळी वैज्ञानिक डॉ. संजय सिंग, डॉ. अरूण सप्रे उपस्थित होते. ‘वालचंद’मधील विद्यार्थ्यांच्या तीन संघांनी तीन उपकरणे बनवली आहेत. यामध्ये सोलरवर चालणारी सायकल, मेडिकल उपकरणे, ग्रामीण मुलांसाठी सॉफ्टवेअर आदींचा समावेश आहे. काकोडकर यांनी या मुलांचे कौतुक केले. ही उपकरणे तयार करण्यासाठी प्रा. नारायण मराठे, डॉ. एस. पी. चव्हाण, प्रा. सुहास जगताप, प्रा. विजय महाले यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
समाजाला सुखी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आवश्यक
By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST