सांगली : येथील शासकीय रुग्णालयात नवीन ‘ओपीडी’ बांधण्यास ‘रेड सिग्नल’ दाखविणाऱ्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी चांगलेच धारेवर धरले. ‘शासकीय काम थांबविण्याचा तुम्हाला अधिकार नाही. सांगली-मिरज असा कोणताही दुजाभाव करू नका. दोन्ही रुग्णालये एकच आहेत. नवीन ओपीडी सांगलीतच होईल’, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. शासकीय रुग्णालयाच्या आवारात नवीन ओपीडी बांधण्यासाठी चार वर्षापूर्वी १७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यातील साडेसहा कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाले आहेत, पण डॉ. डोणगावकर यांनी हा निधी मिरज वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचा असल्याचे सांगून, नवीन ओपीडी बांधू नये, असे लेखी पत्र शासनाला दिले होते. यावर आ. सुधीर गाडगीळ यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी थेट तावडे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे तावडे यांनी मंगळवारी याप्रश्नी मंत्रालयात बैठक बोलविली होती. या बैठकीत खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार हाफिज धत्तुरे व डॉ. डोणगावकर उपस्थित होत्या. यावेळी तावडे यांनी डोणगावकर यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, सांगली, मिरजेतील दोन्ही रुग्णालयांचा विस्तार झाला पाहिजे. दोन्ही रुग्णालयांत सुविधा वाढल्या पाहिजेत. अधिकारी म्हणून सांगली-मिरज असा दुजाभाव करू नका. शासनाने निधी मंजूर केला असताना, एवढे दिवस काम का सुरु केले नाही? दोन्ही रुग्णालयांत वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे सर्वकाही मिरजेलाच पाहिजे, असे हट्ट धरू नका. मिरजेसाठीही स्वतंत्र निधी दिला जाईल. यासाठी शासन समर्थ आहे. अधिकारी म्हणून काम करताना तुम्हाला रुग्णालयात सुविधांची उणीव भासत असेल, तर त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवावा. मंत्रिमंडळात चर्चा करुन त्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल. पण ओपीडीचे काम थांबविण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे काम तातडीने सुरु झाले पाहिजे. गोरगरिबांचा आधार म्हणून या रुग्णालयाचा पश्चिम महाराष्ट्रात लौकिक आहे. हे रुग्णालय भविष्यात सर्व सोयींनी सुसज्ज झाले पाहिजे. मी स्वत: सांगली दौऱ्यावर येऊन या दोन्ही रुग्णालयांची पाहणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अधिष्ठातांना हटवावे : गाडगीळ आ. सुधीर गाडगीळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांच्या विरोधामुळे ओपीडीचे काम थांबले होते. त्यामुळे त्यांची अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली आहे. तसेच ओपीडीचे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाचे सुशोभिकरण करण्यासाठी आणखी दहा कोटीचा निधी देण्याची मागणी तावडे यांच्याकडे केली आहे. या दहा कोटीमधून रुग्णालयाची रंगरंगोटी, इमारतीची दुरुस्ती, जुन्या पाईपलाईन बदलणे यांसह अन्य कामे करण्याचा विचार आहे. तावडे यांनी यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे. संलग्नता राहणार : शिवाजीराव नाईक आ. शिवाजीराव नाईक म्हणाले, सांगलीचे शासकीय रुग्णालय मिरजेला हलविण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला होता. यासंदर्भात मी स्वत: विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. आजच्या बैठकीच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा चर्चेला आणला होता. त्यावेळी तावडे यांनी, सांगलीच्या रुग्णालयाची मिरज वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नता कायम राहील. रुग्णालय मिरजेला हलविले जाणार नाही. येथून पुढे जे काही नवीन करायचे असेल, त्याची सुरुवात सांगलीच्या रुग्णालयातूनच केली जाईल, असे सांगितले आहे.(प्रतिनिधी)
नवीन ‘ओपीडी’ सांगली सिव्हिलमध्येच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2015 00:17 IST