तासगाव : तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सुशिला साळुंखे, विजया जामदार, रजनी लंगडे या तीन नगरसेविकांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपकडून स्वबळावर हालचाल सुरु झाली आहे. मात्र अविश्वास ठराव मंजुरीसाठी चौदा मतांची मॅजिक फिगर आवश्यक आहे. ती मिळविण्यासाठी भाजप काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पाठबळावर काँग्रेसचा एकमेव नगराध्यक्ष संजय पवार यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत काँग्रेससह राष्ट्रवादीचे नऊ आणि भाजपचे अपक्षांसह नऊ, असे सम-समान संख्याबळ आहे. मात्र दोन महिन्यांपासून नगराध्यक्ष बदलाबाबत दोन्ही गटातील नगरसेवकांत हालचाल सुरु होती. मात्र कोणत्याही एक गटाकडे अविश्वास ठराव आणण्याइतपत मॅजिक फिगर नव्हती. त्यामुळे दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन नगराध्यक्ष बदलाचा निर्णयही झाला होता. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिल्यामुळे हा निर्णय बारगळला. नेमका याचा फायदा घेत भाजपने राष्ट्रवादीतील नाराजांना गळ लावला. गुरुवारी रात्री उशिरा खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांची बैठक झाली. याचवेळी तीनही नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. या नगरसेविकांच्या भाजप प्रवेशामुळे नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व झाले आहे. मात्र नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आवश्यक असणारी १४ मतांची ‘मॅजिक फिगर’ गाठता आलेली नाही. (वार्ताहर)‘लोकमत’चा अचूक अंदाज --‘भाजपकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून २५ आॅगस्ट रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. राष्ट्रवादीतील नाराज नगरसेविकांना भाजपमध्ये घेऊन नगरपालिकेची सत्ता काबीज करणार असल्याबाबतचा अंदाज वर्तवला होता. नाराज असलेल्या नगरसेविकांची नावेदेखील प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाराजांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला होता. ‘लोकमत’ने अंदाज व्यक्त केलेल्या नगरसेविका सुशिला साळुंखे आणि विजया जामदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ‘लोकमत’चा अंदाज अचूक ठरला आहे, तर नगरसेविका रजनी लंगडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा भाजपकडून केला जात असला तरी, अजूनही त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याची चर्चा आहे.भाजपने अविश्वास ठराव आणण्यासाठी तयारी केली असली तरी, मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी पक्ष सोडला असला तरी तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. - संजय पवार, नगराध्यक्षनगराध्यक्ष पदाची संधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सुशिला साळुंखे यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या टर्ममध्ये संधी देण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे, तर राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दुटप्पी भुमिकेमुळे, तसेच अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणामुळेच कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती नगरसेविका सुशिला साळुंखे यांनी दिली. नगरसेविका लंगडेंची रजा रद्द राष्ट्रवादीच्या नगरसेविका रजनी लंगडे यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सहा महिन्यांची रजा मंजूर करुन घेतली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरु झाली असतानाच, नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लंगडे यांनी रजा रद्द करण्याबाबत शुक्रवारी मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला.
राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक भाजपात
By admin | Updated: September 11, 2015 23:06 IST