इस्लामपूर : आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे अपयश लपविण्यासाठी विकासकामांना विकास आघाडीचा विरोध आहे, असे बिनबुडाचे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करण्याची स्टंटबाजी राष्ट्रवादी काँग्रेसने थांबवावी. निवडणूक कधीही लागू दे, पुन्हा विकास आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असे खणखणीत प्रत्युत्तर आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिले.
शहराच्या विकासकामांचे विषय असणाऱ्या सभेला आक्षेप घेऊन राष्ट्रवादीनेच विकासाला विरोध केल्याचा पलटवार त्यांनी केला.
पाटील म्हणाले, विषयपत्रिकेवरील एकूण ८२ पैकी ६५ विषय हे राष्ट्रवादीने दिले होते, तर उर्वरित १७ विषय हे नागरिक आणि आघाडीच्या नगरसेवकांनी दिले होते. हे सर्व विषय विकासाचे आहेत. त्यांना मंजुरी देऊन सभा अर्ध्या तासात संपवूया हे मी स्वतः राष्ट्रवादीच्या सदस्यांना बोललो होतो. मात्र, विकास आघाडी सहकार्य करणार आहे याची चाहूल लागताच संजय कोरे यांनी सभेलाच आक्षेप घेत चित्रीकरणाची मागणी केली. आम्ही त्यालाही पाठिंबा दिला होता. शेवटी त्यांच्याच मागणीवरून ही सभा तहकूब झाली. त्यात आमचा काय दोष होता.
ते म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे ३० ची सभा ३१ मार्चला ऑनलाईन पद्धतीने झाली. काहीवेळा आवाज ऐकू येत नव्हता, काय चालले आहे हे समजत नव्हते. त्यावेळी कोरे यांनी विकासकामे असणारी विषयपत्रिकाच बेकायदेशीर आहे, असा आक्षेप घेतला. त्यामुळे विकासकामांना राष्ट्रवादीचाच विरोध होता हे स्पष्ट झाले. यावेळी निवास पाटील, गणेश परीट, समीर आगा उपस्थित होते.
चाैकट
पुरावे द्या, कारवाई करतो..!
राष्ट्रवादीच्या विश्वनाथ डांगे यांनी भुयारी गटार कामात काहींनी खिसे भरल्याचा आरोप केला. त्यावर विक्रम पाटील म्हणाले, कुणी खिसे भरले त्यांची नावे सांगा, पुरावे द्या आम्ही कारवाई करतो. मात्र, बिनबुडाचे आरोप करू नका, असा इशारा दिला. यापूर्वी चुकीचा आणि नागरिकांची पिळवणूक करणारा कारभार कुणी केला आहे, हे समोर आले आहे. निवडणुकीपूर्वी ९० टक्के कामे पूर्ण करून आम्हीच सत्तेत येणार आहोत. तेवढा विश्वास आम्ही जनतेच्या मनात निर्माण केला आहे.