खानापूर : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच झाले पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खानापूर येथे सोमवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व युवक नेते ॲड. वैभव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक राजेंद्र माने यांनी केले.
आंदोलनात खानापूर पूर्व भागातून विविध गावांतून आलेले सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांच्यासह युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. आंदोलकांनी दिलेले निवेदन मंडल अधिकारी एस. ए. साळुंखे यांनी स्वीकारले.
वैभव पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. पुढील काळात उपकेंद्रासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी, उपकेंद्राच्या कामाचा खानापूर येथे जोपर्यंत पायाभरणी शुभारंभ होत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याचे सांगितले. युवकांनी राजकीय हेतूने प्रेरित न होता योग्य ते योग्य, चुकीचे ते चुकीचे, अशी भूमिका घेण्याचे आवाहनही शिंदे यांनी केले.
नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते राजेंद्र माने यांनी उपकेंद्र खानापूरला होण्यासंदर्भात सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, आजच्या आंदोलनामुळे बस्तवडे जागेची पाहणी स्थगित झाली हे या लढ्याचे यश आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक माणिक भगत व करंजे येथील युवक प्रतिनिधी आकाश मासाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनात नगरसेवक आनंदराव मंडले, हर्षल तोडकर, ॲड. युवराज गोडसे, अशोक भगत, दौलत भगत, व्यंकट भगत, मारुती जाधव, शाहरूख पठाण, सचिन जाधव, विजय भगत, रूपेश पवार, पिंटूशेठ जाधव, शुभम टिंगरे, अजिंक्य धाबुगडे, प्रशांत जिरगे सहभागी झाले होते.
चक्का जाम आंदोलनामुळे गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.