सांगली : राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. आता विधानसभा निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही राष्ट्रवादी नेत्यांनी आघाडी धर्म पाळावा, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केले आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर मोहनराव कदम यांना विचारले असता ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून निवडणुका लढविल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसची निश्चित आघाडी होणार आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडी होत असेल, तर जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत आघाडीत बिघाडी कशासाठी? काँग्रेसकडे जिल्हा परिषदेतील संख्याबळ कमी असले तरीही, राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला पदाधिकारी निवडीत संधी द्यावी. ते दोन्ही काँग्रेसच्यादृष्टीने फायद्याचे असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँगे्रसच्या प्रस्तावाचा विचार करावा, असेही कदम यांनी स्पष्ट केले.तसेच ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत काँग्रेसला संधी दिली नाही, तर काँग्रेस जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी काँग्रेस सदस्यांची २० सप्टेंबर रोजी सांगलीतील काँग्रेस भवन येथे बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पदाधिकारी निवडीची निवडणूक लढविण्याबाबत चर्चा होणार आहे. सदस्यांची बाजू समजून घेऊनच निर्णय होणार आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.दरम्यान, कदम यांनी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळण्याची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी सदस्यांमध्ये नाराजांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांची उद्या बैठकजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष दोन आणि जनसुराज्य एक अशा ३६ सदस्यांची बैठक दि. १७ रोजी सांगलीतील राष्ट्रवादी कार्यालयात होत आहे. या बैठकीला किती सदस्य उपस्थित राहतात आणि किती गैरहजर यावरच काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, यावर चर्चा राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे.जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबलराष्ट्रवादी काँग्रेस ३३काँग्रेस२३स्वाभिमानी आघाडी३जनसुराज्य१अपक्ष२एकूण सदस्य६२जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३३ सदस्यसंख्या असून, त्यांचे स्पष्ट बहुमत आहे. याशिवाय दोन अपक्ष आणि जनसुराज्यसह त्यांची सदस्यसंख्या ३६ होत आहे. तरीही काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीकडे जिल्हा परिषदेतही आघाडीचा धर्म पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे पदाधिकारी निवडीला वेगळे वळण मिळाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नेते भाजप, शिवसेनेत गेले असून, त्यांचे आठ समर्थक जिल्हा परिषद सदस्य कोणती भूमिका घेणार, यावरच काँग्रेसच्या दबावाचा परिणाम होणार आहे.
राष्ट्रवादीने झेडपीतही आघाडी धर्म पाळावा
By admin | Updated: September 15, 2014 23:35 IST