शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील सत्ताबदलाला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात विरोधक कोण, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. राज्यातील सत्तेचा पुरेपूर फायदा उचलत राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत जोमात आहे, तर बहुमत असतानाही सत्तेबाहेर फेकलेल्या भाजपला अजूनही भूमिका ठरविता आलेली नाही. तसेच सत्तेत सहभागी काँग्रेसचे मात्र तळ्यात-मळ्यात सुरू आहे. कधी सत्ताधारी, तर कधी विरोधक म्हणून काँग्रेसच सक्रिय आहे.
महापालिकेच्या २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने सत्तेचा सोपान भाजपच्या हाती सोपविला. पण अडीच वर्षात भाजपला फुटीचे ग्रहण लागले. नगरसेवकांच्या आशा-आकांक्षांकडे नेत्यांनी केलेले दुर्लक्ष भाजपच्या सत्ता विसर्जनाला कारणीभूत ठरले. राष्ट्रवादीने महापौर पदावर बाजी मारत काँग्रेसवर कुरघोडी केली. पण आता ही कुरघोडी काँग्रेस नगरसेवकांच्या पचनी पडताना दिसत नाही. राज्यात महाआघाडीची सत्ता, त्यात पालकमंत्री जयंत पाटील यांचा वरदहस्त यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक जोमात आहेत. कुपवाड ड्रेनेज, एलईडीसारखे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. घनकचऱ्याचा प्रश्न लवकरच निकालात निघणार आहे. पण या साऱ्या घडामोडीत काँग्रेस मात्र फारशी कुठेच दिसत नाही.
त्यामुळेच नाराज झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासमोर राष्ट्रवादीबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. आता त्यालाही महिन्याचा काळ लोटला. पण दोन्ही पक्षात समन्वय राखण्याच्यादृष्टीने एकही पाऊल पुढे पडलेले नाही. एकीकडे राष्ट्रवादीच्या बरोबरीने काँग्रेसचे काही पदाधिकारी बसलेले असतात, तर तेच पदाधिकारी राष्ट्रवादीकडून आलेल्या एखाद्या विषयाला विरोधही करतात. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसला सत्ताधारी व विरोधक अशी दुहेरी भूमिका पार पाडावी लागत आहे. दोन्ही डगरीवर ‘हात’ ठेवून काँग्रेसचा कारभार सुरू आहे.
४० वर्षांनंतर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपला अडीच वर्षातच विरोधात बसावे लागले. महापौर पदाच्या निवडीनंतर भाजपचे मोजकेच नगरसेवक आक्रमक होते. पण महिन्याभरातच त्यांचे अवसानही गळाले आहे. भाजपला नेमकी कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्न पडला आहे. विरोधक असल्याचे त्यांना मान्य नाही आणि सत्तेतही ते नाहीत. पक्षाची दिशाच स्पष्ट नसल्याने नगरसेवकांत चलबिचलता आहे. परिणामी सध्याचे संख्याबळ कायम राखण्याचे आव्हानही भाजप नेत्यांसमोर आहे.
चौकट
काँग्रेस, भाजपच्या बैठका
महापालिकेतील कारभाराविरोधात काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे तक्रारी केल्या. पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांतही अस्वस्थता आहे. दुसरीकडे भाजपने नगरसेवकांची एकजूट टिकविण्यासाठी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीविरोधात आक्रमक होण्याचा संदेश नेत्यांनी दिला. पण त्याचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न आहे.