जुनेखेड : नवेखेड (ता. वाळवा) येथील महिलांनी दारूबंदीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. आज दारूबंदीसाठी आवश्यक कोरमच्या पडताळणीसाठी आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर उत्स्फूर्तपणे हजेरी लावत महिलांनी दारूबंदीबाबतचा आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.गेल्या काही वर्षात आजूबाजूच्या गावातून दारूबंदी होत असताना नवेखेडमध्ये मात्र काही ठिकाणी चोरून, तर काही ठिकाणी खुलेआम देशी दारूची विक्री सुरू होती. याबाबत विशेषत: महिलांमधून तीव्र नाराजी होती. यापूर्वीही नवेखेडमध्ये तानाजी नामदेव चव्हाण यांच्या सरपंच पदाच्या कालावधित व बाबूराव चव्हाण पोलीस पाटील असताना दारूबंदीचा प्रयत्न झाला; मात्र पुन्हा जोमाने दारू विक्री सुरू झाली.महिलांमधील दारूबंदीबाबतचा दबाव पाहता, नवेखेड ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २0१२ च्या ग्रामसभेत दारूबंदीबाबतचा ठराव केला. मात्र पुढील कार्यवाही झाली नाही. अखेर आॅगस्ट २0१४ मध्ये शंभू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. शीतल पाटील, विद्यमान सरपंच सौ. छायाताई जाधव, उपसरपंच रवींद्र चव्हाण, प्रदीप चव्हाण, संगीता कीर्दक, ग्रामपंचायत व अंगणवाडी सदस्यांनी पुढाकार घेत संपूर्ण गावातून दारूबंदीबाबत महिलांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवून तसे निवेदन उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आज दारूबंदीसाठी आवश्यक कोरमच्या पडताळणीसाठी अधिकारी दाखल झाले. या अधिकाऱ्यांसमोर उत्स्फूर्तपणे हजेरी लावत महिलांनी दारूबंदीबाबतचा आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. (वार्ताहर)मागणीला आले बळअधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३५० च्या दरम्यान महिलांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र ४६० महिलांनी पडताळणीसाठी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत दारूबंदीबाबतच्या आपल्या मागणीला आणखी बळ देण्याचा प्रयत्न केला
नवेखेडला दारूबंदीसाठी हालचाली
By admin | Updated: November 21, 2014 00:30 IST