दत्ता पाटील -- तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार गुरुवारी तासगावात येत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तासगावात राष्ट्रवादीकडून आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. आर. आर. पाटील आबांच्या पश्चात पक्षात आलेली मरगळ झटकून मोर्चेबांधणीस सुरुवात होण्याची शक्यता आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पक्षाची सूत्रे आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे आली. मात्र आबांसारख्या राज्यव्यापी नेतृत्वाची पोकळी भरुन निघाली नाही. आबांच्या पश्चात सुमनताई यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी राष्ट्रवादीने भाजपला कडवी झुंज देत बाजार समितीचा बालेकिल्ला कायम राखला. मात्र त्यानंतर गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत मरगळ आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती यांसारखी सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. पक्षाकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे. मात्र पदाधिकाऱ्यांची उदासीनता आणि पक्षात आलेली मरगळ यामुळे वर्षभरात तालुक्यात राष्ट्रवादीकडून कोणतीच उठावदार कामगिरी झालेली नाही. केंद्रात आणि राज्यात विरोधी शासन आहे. मतदारसंघात भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे कडवे आव्हान आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपविरोधात आक्रमक भूमिका असायला हवी होती. मात्र तशी परिस्थिती दिसून येत नाही.तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे सत्तास्थान उलथवून खासदारांनी भाजपचे कमळ फुलविले. राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना भाजपमय केले. राष्ट्रवादी डळमळीत करण्यासाठी भाजपकडून अनेक यशस्वी डावपेच आखण्यात आले. मात्र अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडून कोणताच प्रतिकार करण्यात आला नाही. तासगाव बसस्थानकालगत असलेल्या व्यापारी संकुलाचे नामकरण करण्याचा मुद्दादेखील राष्ट्रवादीसाठी अस्मितेचा असतानाही, पक्षातील पदाधिकारी मूग गिळून होते. आबा असताना अवास्तव वक्तव्ये करणारे राष्ट्रवादीचे शिलेदार आबांच्या पश्चात आत्मविश्वास हरवल्यासारखे वावरत आहेत. त्यामुळे भाजपला आणि पर्यायाने संजयकाकांना तालुक्यात विरोधक आहे की नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.तासगाव बाजार समितीत आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तासगावात येत आहेत. आबांच्या पश्चात पवार यांचा पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रम होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीने जय्यत तयारी केली आहे. शहरातील, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांत उत्साह संचारल्याचे वातावरण आहे. पालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रवादीकडून या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार हे निश्चित.आज कार्यक्रम : अजितदादांकडे लक्ष आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तालुक्याच्या पालकत्वाची जबाबदारी आमदार जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र आमदार पाटील यांच्याशी तालुक्यातील कार्यकर्त्यांचे सूर जुळले नाहीत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बदलाच्या निर्णयातूनही तालुक्यातील राष्ट्रवादीअंतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.मरगळ झटकणार का?तासगाव शहरासह तालुक्यात राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहेच. किंबहुना तासगाव शहरातही आबाप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र काही महिन्यांपासून शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. पदाधिकाऱ्यांचा आत्मसंतुष्टपणा आणि प्रभावी विरोधक म्हणून काम करण्याबाबतची हतबलता यामुळेच पक्षावर ही वेळ आली आहे. पवारांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ही मरगळ झटकणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. राष्ट्रवादी कारभाऱ्यांच्या कार्यशैलीत बदल झाला नाही, तर मात्र पक्षाला त्याची किंमत मोजावी लागणार, हे नक्की.
राष्ट्रवादी फुंकणार निवडणुकीचे रणशिंंग
By admin | Updated: June 16, 2016 00:58 IST