लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी उपक्रमांतर्गत आमदार मानसिंगराव नाईक व युवा नेते विराज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सर्व शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी. विद्यार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत, त्याचे शुल्क आकारू नये. असे शुल्क आकारणाऱ्या संस्थांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांचे नवीन शुल्क निश्चित करावे. तोपर्यंत पालकांकडून शिक्षण संस्थांना शुल्क आकारण्याचा हक्क नाही, असा आदेश काढावा. केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रथमेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध नलवडे, प्रतीक सिंग, सुवर्णभूषण देसाई, सत्यम पोटे, सौरभ गायकवाड, सुशांत प्रसादे, आदी उपस्थित होते.