शीतल पाटील -सांगली -महापालिकेतील सत्तेचे राजकारण दिवसेंदिवस बदलू लागले आहे. विरोधकांत फूट पाडून एकहाती सत्ता उपभोगण्याची काँग्रेसची जुनीच खेळी पुन्हा यशस्वी ठरू लागली आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी प्रभाग समिती सभापती निवडीत पुन्हा एकदा आला. राष्ट्रवादीला पदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले. त्यामुळे एक प्रभाग समिती ताब्यात असलेली राष्ट्रवादी आता पदाच्या शर्यतीत शून्यावर आली आहे. त्याचवेळी स्वाभिमानी आघाडीतही भाजप, शिवसेना असे तुकडे पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महापालिकेच्या प्रभाग समितीवरील वर्चस्वाची लढाई अखेर काँग्रेसने जिंकली. पण या लढाईत स्वाभिमानी आघाडीशी याराना करण्यात ते यशस्वी ठरले. गतवर्षी काँग्रेसने राष्ट्रवादीशी जवळीक साधत स्वाभिमानीला धक्का दिला होता. राष्ट्रवादीला एका प्रभाग समितीचे सभापतीपद देऊन तीन समित्या आपल्या ताब्यात ठेवण्यात काँग्रेसच्या धुरंधराला यश आले होते. तेव्हापासूनच स्वाभिमानी आघाडी राष्ट्रवादीवर नाराज होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भाजपचे सुधीर गाडगीळ यांचा प्रचार केला होता. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात काँग्रेसने राष्ट्रवादीला बेदखल करण्याचा विडा उचलला. त्याचा पहिला अंक महापौर, उपमहापौर निवडीवेळी झाला. मंगळवारी दुसऱ्या अंकात प्रभाग सभापती निवडीत काँग्रेसने राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी केली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या उक्तीप्रमाणे स्वाभिमानी आघाडीला जवळ केले. या तडजोडीच्या राजकारणात अकरा सदस्य असलेल्या स्वाभिमानीच्या पारड्यात एका प्रभाग समितीचे सभापतीपद पडले. विशेष म्हणजे याच स्वाभिमानीला एक स्वीकृत नगरसेवक पद देण्यासाठी काँग्रेसच्या दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता. स्वाभिमानी व काँग्रेसची जवळीकता राष्ट्रवादीला घायाळ करून गेली. सर्वात मोठा विरोधी पक्ष आणि दोन प्रभाग समित्यांमध्ये विरोधकांची ताकद जादा असतानाही त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. या निवडीत केवळ राष्ट्रवादीवरच आघात झाला नाही, तर स्वाभिमानीत फूट पडल्याचे दिसून आले. स्वाभिमानीतील स्वरदा केळकर व युवराज बावडेकर या दोन नगरसेवकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला, तर इतर सात सदस्यांनी माजी आमदार संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांच्याशी निष्ठा कायम ठेवली. नगरसेवक गौतम पवार व गटनेते शिवराज बोळाज यांच्यावर, स्वार्थासाठी काँग्रेसकडे स्वाभिमान गहाण ठेवल्याची टीका स्वरदा केळकर यांनी केली, तर राष्ट्रवादी, भाजप की स्वाभिमानी आघाडी यापैकी कोणत्या पक्षाच्या आहेत हे केळकर यांनी जाहीर करावे, असे प्रतिआव्हान पवार यांनी दिले. एकूणच स्वाभिमानीत नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. त्याला भाजप-शिवसेना असा रंग चढला आहे. स्वाभिमान गहाण ठेवला : केळकरस्वाभिमानी आघाडीने सभापती निवडीत विश्वासघात केला, त्यांनी काँग्रेसपुढे स्वाभिमान गहाण ठेवल्याची टीका नगरसेविका स्वरदा केळकर यांनी केला. निवडीपूर्वी स्वाभिमानीच्या गटनेत्यांनी मदनभाऊ पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांचा शब्द मोडता येणार नाही, असे त्यांनी आपल्याजवळ स्पष्ट केले आहे. स्वाभिमानीच्या नेत्यांनी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी तडजोडीचे राजकारण केले. एकीकडे राज्यात महामंडळासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे मात्र काँग्रेसशी घरोबाही सुरू आहे. याबाबत आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.सांगा, तुम्ही कोणत्या पक्षाचे? : शिवराज बोळाजस्वरदा केळकर यांनी पालिकेत भाजपचा स्वतंत्र गट असल्याचे जाहीर केले होते. स्वार्थ असेल तेव्हा स्वाभिमानी आणि नसेल तेव्हा भाजपचे, अशी त्यांची वृत्ती आहे. नेमक्या त्या कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांनी आधी जाहीर करावे. कधी राष्ट्रवादी, कधी भाजप, तर कधी स्वाभिमानीचे नाव त्या घेतात. राष्ट्रवादीने आजपर्यंत आमचा विश्वासघात केला आहे. गतवर्षी सभापती निवडीवेळी त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. तेव्हाही स्वरदा केळकर गैरहजर राहिल्या होत्या. त्या पालिकेबाहेर गाडीत बसून हसत होत्या. राष्ट्रवादीने पाठिंबा द्यायचाच होता तर स्वाभिमानीला द्यावा, एकट्या केळकर यांना कशासाठी? त्यांनीच केळकर यांना फूस लावली. आम्ही राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाणार नाही. आजच्या निवडीवेळी महापौर विवेक कांबळे यांनी आमची भेट घेतली. महापौर निवडीवेळी पाठिंबा दिला होता, आताही साथ द्यावी, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही निर्णय घेतल्याचे स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी घायाळ, स्वाभिमानी दुभंगली
By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST