सांगली : शहरासह जिल्ह्यातील अनेक परमिट बार, वाईन शाॅप चालकांनी लाॅकडाऊनच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येते. रात्री दहानंतरही उशिरापर्यंत काही परमिट बारमध्ये झिंगाट सुरू असते. काही बारचालकांवर उत्पादन शुल्क व पोलीस खात्याने कारवाईचा बडगाही उगारला आहे. तरीही बारचालकांकडून अजूनही नियमांना खुलेआम हरताळ फासण्याचेच काम सुरू आहे.
लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील परमिट बार, हाॅटेल्सना सशर्त परवानगी देण्यात आली. सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत परमिट बार, वाईन शाॅप सुरू ठेवण्याची मुभा आहे; पण या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचेच दिसून येते. शहरासह महापालिका हद्दीबाहेरही रात्री उशिरापर्यंत बार सुरू आहेत. कारवाई टाळण्यासाठी चालकांनी शक्कल लढविली आहे. रात्री दहा वाजताच बारबाहेरील विद्युत दिवे बंद केले जातात; पण आतमध्ये मात्र खुलेआम मद्यपान सुरू असते. त्यात ५० टक्के क्षमतेच्या आदेशाचेही पालन होत नाही. अनेक बार तर हाऊसफुल्ल असतात. रात्री उशिरापर्यंत या बारमधून झिंगत लोक बाहेर पडतात; पण त्यांच्यावरही कारवाई होताना दिसत नाही.
चौकट
शहरातील हाॅटेल १
कोल्हापूर रस्त्यावरील अनेक परमिट बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. त्यात काही चालकांनी बारबाहेरचे दिवे बंद केले होते; तर आतमध्ये मात्र ग्राहकांची लगबग होती.
शहरातील हाॅटेल २
शंभर फुटी रस्त्यावरील तीन ते चार परमिट बारमध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची ये-जा सुरू होती. बारबाहेर दुचाकी वाहने होती. केवळ प्रवेशद्वार बंद केले होते. तिथे ५० टक्क्यापेक्षा अधिक ग्राहक होते.
शहराबाहेरील हाॅटेल १
सांगली-तासगाव रस्त्यावरील अनेक परमिट बार, बिअर शाॅपी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे आढळून आले. ग्राहकांची गर्दी होती. हे बार रात्रीपर्यंत नेहमीच सुरू असतात, असे सांगण्यात आले.
शहराबाहेरील हाॅटेल २
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील परमिट बार, वाईन बार बिनदिक्कतपणे सुरू होते. ग्राहकांची ये-जा सुरू होती. बारबाहेर वाहनांची संख्या पाहता नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचेच दिसून आले.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
१. जिल्ह्यातील बार, हाॅटेल्स, खाद्यगृहे सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई करावी.
२. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. प्रवेश करण्याच्या ठिकाणी सॅनिटायझर, थर्मल, सामाजिक अंतर, डिजिटल पेमेंटला प्राधान्य, निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आदी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
चौकट
कोट
शासनाच्या निर्देशानुसार परमिट बार, वाईन शाॅपी बंद करण्याच्या सूचना सर्वच आस्थापनांना दिल्या आहेत. लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाईही केली जात आहे. पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून बारची तपासणी होत आहे. त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला आहे.
- संध्याराणी देशमुख, अधीक्षक, उत्पादन शुल्क
चौकट
परमिट बार : ५१९
बिअर, वाईन शाॅपी : ९६