शिराळ्यातून भाजपचा झेंडा फडकविणाऱ्या शिवाजीराव नाईक यांना राज्यातील भाजपच्या मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. युती शासनाच्या काळात अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते. ते तब्बल अकरा वर्षे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा दीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. मधील काळात राष्ट्रवादी, काँग्रेस असा प्रवास करून ते भाजपमध्ये स्थिरावले आहेत. मागील निवडणुकीत पराभूत झाल्यापासून त्यांनी काँग्रेसशी फारकत घेतली होती. यादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींशी त्यांची जवळीक वाढली. या निवडणुकीत ते ‘स्वाभिमानी’कडून रिंगणात उतरतील, असा अंदाज होता, मात्र जागावाटपाचा तिढा सोडवताना खुद्द शेट्टींनीच त्यांना भाजपमध्ये पाठवले व उमेदवारीही मिळवून दिली. आता सरकार स्थापनेत शेट्टींच्या संघटनेच्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य मंत्रिपदाची संधी नाईक यांनाच मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे. कारण दक्षिण महाराष्ट्रातून शेट्टींशी सर्वाधिक जवळीक असलेले ते एकमेव आमदार आहेत.जतमधून भाजपच्याच विलासराव जगताप यांनी एकहाती विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी उघडपणे खासदार संजय पाटील यांचा प्रचार करून मताधिक्यही मिळवून दिले होते. त्यामुळेच जतमध्ये प्रकाश शेंडगेंचा पत्ता कापून भाजपने जगतापांना उमेदवारी दिली. पाणीप्रश्न, दुष्काळी उपाययोजनांचा गाढा अभ्यास असणाऱ्या जगतापांना खा. संजय पाटील यांच्या आग्रहातून मंत्रीपद मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नाईक, जगतापांना मंत्रीपद?
By admin | Updated: October 20, 2014 00:58 IST