सांगली : विज्ञानयुगात सर्व न्यूनगंड दूर ठेवून मुुस्लिम समाजाने शिक्षणातून आपली सर्वांगीण प्रगती साधावी, असे आवाहन आ. शिवाजीराव नाईक यांनी केले. येथील मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या शालेय इमारत, सीसटीव्ही कॅमेरे, ई-लर्निंग आदी उपक्रमांचे मान्यवरांच्याहस्ते आज (रविवार) उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मदन पाटील होते.येथील मोहंमदिया अॅग्लो उर्दू हायस्कूल पटांगणामध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी महापालिकेचे आयुक्त अजीज कारचे, माजी आ. हाफिज धत्तुरे, डॉ. प्रा. बशीरअहमद मोमीन, सौ. अबेदा इनामदार आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, या मुस्लिम संस्थेने अनेक संधींचे सोने केले आहे. सध्याचे युग हे वैज्ञानिक युग आहे. यामध्ये शिक्षणाला अन्यन्य साधारण महत्त्व आहे. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालकांनी वाव दिला पाहिजे. शिक्षणानेच समाजाचे चित्र बदलणार आहे. यावेळी मदन पाटील म्हणाले की, चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारी ही संस्था असून, याठिकाणी आता डिजिटल शिक्षण सुरु करावे, यासाठी आपले सर्व ते सहकार्य असणार आहे. यावेळी कारचे म्हणाले की, मुस्लिम समाजाने न्यूनगंड सोडून मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे. सध्याच्या युगात सर्वांनाच प्रगतीचे दरवाजे खुले असून, ते सर्वांसाठी समान आहेत. सौ. इनामदार म्हणाल्या की, सर्व समस्यांचे मूळ केवळ शिक्षणात आहे. मुस्लिम समाजाने ६५ टक्क्यावरून साक्षरता शंभर टक्क्यावर नेली पाहिजे. अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या शैक्षणिक सोयी-सवलतींचा लाभ आता सर्वांनी घेतला पाहिजे. यावेळी प्रा. बशीर मोमीन यांनीही मनोगत व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष शफीभाई बागवान यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव हारुण इस्हाक परांडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रजा (अन्वर) खान यांनी केले. यावेळी सलीमभाई फुलारा, असलम बागवान, इस्माईल बागवान, फकीरमोहंमद बागवान, सखाराम घारपुरे, लतीफ शेख आदी उपस्थित होती. (प्रतिनिधी)उर्दू माध्यमाचे महाविद्यालयनाईक म्हणाले की, सांगलीत उर्दू माध्यमाचे लवकरच महाविद्यालय सुरूकरण्यात येईल. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले असून, त्यांनीही संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. उर्दू माध्यमातील वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावे लागणार नाही, यासाठी आपण व मदन पाटील प्रयत्न करू.
मुस्लिमांनी आधुनिक शिक्षणातून प्रगती करावी
By admin | Updated: March 30, 2015 00:15 IST