इस्लामपूर : शहरातील पेठ रस्त्यावरील ॲक्सिस बँकेसमोरून पायी निघालेल्या आईस्क्रीम विक्रेत्यावर पाठीमागून आलेल्या अल्पवयीन हल्लेखोराने खुनी हल्ला केला. यामध्ये विक्रेत्याच्या पाठीत आणि पोटावर वर्मी वार झाल्याने त्याची आतडी बाहेर आली होती. ही घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील अल्पवयीन हल्लेखोराला पोलिसांनी अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले.
रतनलाल मंगनीराम जाट (३५, मूळ रा. कनवास, जि. भिलवाडा, राजस्थान) असे जखमी झालेल्या आईस्क्रीम विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्यावर कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्याचा मित्र किसनलाल भैरूलाल गाडरी (१९, रा. मोरे कॉलनी, इस्लामपूर) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.
जखमी रतनलाल याचा आईस्क्रीमचा व्यवसाय बंद असल्याने तो किसनलाल याच्या चव्हाण कॉर्नर येथे लावलेल्या गाड्यावर आईस्क्रीम विक्री करत होता. सायंकाळी ७.३०च्या सुमारास रतनलाल आणि किसनलाल हे दोघे प्रशासकीय इमारतीसमोर असणाऱ्या भेळ गाड्यावर भेळ खाण्यासाठी आले होते. तेथे भेळ खाऊन ८ वाजण्याच्या सुमारास हे दोघे पायी पुन्हा चव्हाण कॉर्नरकडे गाड्यावर येत होते.
ॲक्सिस बँकेसमोर दोघे आले असता पाठीमागून आलेल्या अल्पवयीन हल्लेखोराने रतनलालच्या पाठीत व नंतर पोटात चाकू खुपसला. हा वार खोलवर बसल्याने रतनलालच्या पोटातील आतडी बाहेर आली होती. यावेळी रक्तबंबाळ होऊन तो बेशुद्धावस्थेत तेथेच पडला. अचानक झालेल्या हल्ल्याने मित्र किसनलाल याने तेथून पळ काढला. नागरिकांनी रतनलाल याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कऱ्हाडला पाठवले.
या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी हल्लेखोराच्या शोधासाठी गतीने यंत्रणा हलवली. निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक प्रवीण साळुंखे, अरविंद काटे, उपनिरीक्षक समाधान लवटे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दीपक ठोंबरे, अरुण पाटील, आलमगीर लतीफ, शरद बावडेकर, अमोल सावंत यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा परिसर पिंजून काढत अवघ्या दोन तासात हल्लेखोराला जेरबंद केले.