लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील विविध आस्थापना, दुकानांतील कामगारांच्या लसीकरणाची तपासणी मोहीम शुक्रवारपासून हाती घेण्यात आली. उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह पथक रस्त्यावर उतरले होते. लसीकरणाबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल एका दुकानदाराला दंडही करण्यात आला.
महापालिका क्षेत्रातील बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कोरोना लसीकरण केले नसल्याची बाब समोर आली आहे. भविष्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी जास्तीत-जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बाजारपेठेतील आस्थापनात लसीकरण झाले की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
त्यानुसार शुक्रवारी उपायुक्त राहुल रोकडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर काळे, वैभव कुदळे, राजू गोंधळे आदींच्या पथकाने शहरातील मेनरोड, कापडपेठ, मारुती रोड परिसरातील दुकाने आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांना भेटी देत कामगारांच्या लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी एका दुकानातील कामगाराने लसीकरण केले नव्हते. त्यामुळे त्या आस्थापनधारकाला एक हजाराचा दंड करण्यात आला. सध्या दुकानदार, कामगारांना लसीकरणाचे आवाहन केले जात आहे. त्यांनी लस न घेतल्यास या आस्थापना सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त रोकडे यांनी दिला.
चौकट
५९ केंद्रांवर लसीकरण
महापालिका क्षेत्रात ५९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. याशिवाय आरोग्य केंद्रातून लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तातडीने लस घ्यावी. कामगारांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो. कामगारांचे लसीकरण न झाल्यास दुकानमालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.