मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत पार पडली. सदस्यांनी महापालिकेच्या मिरज-बेडग रस्त्यावरील कत्तलखान्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला. कत्तलखान्याचा वस्तुनिष्ठ अहवाल दिला आहे. मात्र, कारवाई प्रलंबित असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी विजय सावंत यांनी सांगितले. यावर अनिल आमटवणे यांच्यासह सदस्य आक्रमक झाले. या कत्तलखान्यामुळे तेथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने महापालिकेने बेकायदा कत्तलखाना बंद करावा. अन्यथा पंचायत समितीचे पदाधिकारी तो बंद पाडणार असल्याचा इशारा उपसभापती अनिल आमटवणे यांनी दिला.
कवलापूरसह तालुक्यातील इतर आरोग्य केंद्रात तातडीने आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी विक्रम पाटील यांनी केली. जिल्ह्यात सौर ऊर्जेवरील पाणी योजना राबविताना विना टेंडर, बयाणा रक्कम न घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोगस सह्यांनी हे काम केल्याने कामात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करीत अशोक मोहिते यांनी चौकशीची मागणी केली. महामार्गासाठीच्या गौण खनिज वाहतुकीने सिध्देवाडी, खंडेराजूरी, गुंडेवाडी गावचे रस्ते उध्वस्त झाले आहेत. कपंनीने कोट्यवधीची राॅयल्टी भरलेली असताना जिल्हा प्रशासन राॅयल्टीमधील दहा टक्के विकास निधी कधी देणार असा सवाल कृष्णदेव कांबळे, काकासाहेब धामणे यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना केला.
चौकट
प्रशासकांचा बिअर बारना परवाना!
मुदत संपलेल्या २२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती होती. प्रशासक काळात किती बिअर बार परवाना दिला असा प्रश्न अशोक मोहिते यांनी उपस्थित केला. विस्तार अधिकारी सदाशिव मगदूम यांनी मालगावात चार व लिंगनूर येथे एक असे पाच परवाने दिल्याचे सांगितले. ग्रामस्थांचा विरोध असताना बेकायदेशीर परवाने देणाऱ्यावर कारवाईची मागणी मोहिते यांनी केली.