लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांवर पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी बाजारपेठेतील सहा दुकानांवर कारवाई करीत ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने प्रशासनाने मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. सकाळी सात ते अकरा या वेळेत भाजीपाला, फळे, किराणा दुकाने सुरू झाली. याचबरोबर काही बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही आपली दुकाने सुरू केल्याचे आढळून आले. यात मोबाईल, कपड व्यापाऱ्यांचा समावेश होता. शहरातील बाजारपेठेत अशी चार दुकाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, सहायक आयुक्त अशोक कुंभार, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने या दुकानांची पाहणी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय टिंबर एरिया व स्टेशन चौकातील दुकानदारांनाही दंड करण्यात आला.
या कारवाईत मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.