सांगली : महापालिका क्षेत्रातील ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित नालेसफाई आठ दिवसात पूर्ण होईल, असे आरोग्य अधिकारी डाॅ. रवींद्र ताटे यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रात २०हून अधिक नाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई केली जाते. गतवर्षी सव्वा कोटी रुपये खर्चून नाल्यांची सफाई व खोलीकरण करण्यात आले होते. त्यामुळे नाले रुंद व खोल झाले. त्यामुळे गतवर्षी पावसाचे पाणी कमी कालावधीत निचरा होऊ शकले. तसेच पुराचे पाणीही लवकर नागरी वस्तीत शिरले नव्हते. यंदाही महापालिकेने नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. पंधरा दिवसांपासून हे काम सुरू आहे. सांगली, कुपवाडमधील प्रमुख नाल्यांच्या स्वच्छतेबरोबर खोलीकरणावर भर देण्यात आला आहे. उर्वरित नालेसफाई आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. मान्सूनपूर्व नालेसफाईमुळे शहरात जास्त काळ पावसाचे पाणी साचून राहणार नाही, याबाबतचे नियोजन आरोग्य यंत्रणेकडून केले जात असल्याचे ताटे यांनी सांगितले.