सांगली : सांगलीत सव्वा महिन्याच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही, त्यामुळे मुंबई पॅटर्न वापरण्याची सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. शुक्रवारी राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेताना त्यांनी ही सूचना केली.
राज्यातील ३६ पैकी १५ जिल्ह्यांत ‘मुंबई पॅटर्न’ राबवावा लागेल असे ते म्हणाले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून दुसरी लाट सुरू झाली, ती अपेक्षेपेक्षा वेगाने पसरली. ५० दिवसांत तब्बल ५५ हजार २९५ रुग्ण सापडले. १,३१५ मरण पावले. सध्या दररोजची रुग्णसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे. शहरात दाट लोकवस्ती असतानाही ग्रामीण भागातच मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. मोठ्या गावांतील रुग्णसंख्या सरासरी ३०० ते ५०० पर्यंत आहे. अशीच स्थिती सातारा व सोलापुरातही आहे. कोल्हापुरात तुलनेने कमी आहे.
लॉकडाऊनला सव्वा महिना लोटला तरी आकडे कमी होताना दिसत नाहीत. वास्तविक लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाल्यानंतर पहिल्या १५ दिवसांतच आलेख कमी होणे अपेक्षित होते; पण तो २००० वर जाऊन आला आहे. अजूनही दीड हजारांपर्यंत आहे.
मुंबईची लोकसंख्या दीड कोटीहून जास्त असतानाही दररोजची रुग्णसंख्या दीड हजारापर्यंतच आहे. शुक्रवारी फक्त १,४१६ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे ‘मुंबई पॅटर्न’ सांगलीतही राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
चौकट
असा आहे मुंबई पॅटर्न...
मुंबईत महापालिकेने घरोघरी सर्वेक्षण केले. संशय येताच तात्काळ चाचणी केली. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना ताबडतोब विलगीकरण केंद्रात दाखल केले. त्यामुळे रुग्णांचा शोध लवकर लागून वेळीच उपचार शक्य झाले. रुग्ण लवकर बरे होऊन मृत्यूदर नियंत्रणात राहिला. या पॅटर्नचे कौतुक सर्वोच्च न्यायालयानेही केले आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण साडेतीन टक्क्यांवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही १५ जिल्ह्यांत मुंबई पॅटर्न राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्याने याद्वारे रुग्णसंख्या नियंत्रणात आणली आहे.
चौकट
घरगुती विलगीकरणातील रुग्ण ‘सुपर स्प्रेडर’
घरगुती विलगीकरणातील रुग्ण मोकाट फिरत इतरांना कोरोनाबाधित करत आहेत. लक्षणे असतानाही चाचण्या न करताच फिरणारे जिल्ह्याला कोरोनाच्या गर्तेत लोटत आहेत. प्रशासनाने रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या चाचण्या केल्या असता मोठ्या संख्येने रुग्ण सापडले. यावरून अनेक छुपे स्प्रेडर गावोगावी फिरत असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी घरोघरी तपासणीत शंका येताच तात्काळ चाचणी गरजेची आहे. पॉझिटिव्ह आढळताच घरात विलगीकरण न करता संस्थात्मक विलगीकरण केल्यास कोरोना नियंत्रणात येईल. जिल्ह्याच्या मानेवरील कोरोनाचे जोखड हटेल.