कडेगाव : कडेगाव तालुक्यात कृषी पंपांच्या वीज बिल वसुलीसाठी विद्युत डीपी (रोहित्र) बंद करून वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
शेतीपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत डीपीमध्ये किरकोळ बिघाड असल्यास दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. याबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना आधी वीज बिल भरा, मग डीपीमधील बिघाड दुरुस्त करतो, असे उत्तर संबंधित कर्मचारी देत आहेत. महावितरणने शेतकऱ्यांना दिलेले वीज बिले ही वाजवीपेक्षा जास्त व मीटर रीडिंग न घेता लादलेली आहेत. वीज बिलांसाठी शेतकऱ्यांवर विविध मार्गांनी दबाव टाकण्यात येत आहे. यात पिकांना पाणी सुरू असतानाच कोणतीही पूर्वसूचना न देताच किरकोळ दुरुस्तीचे कारण दाखवून वीज पुरवठा बंद करणे, थेट डीपीच बंद करणे, जळालेली डीपी त्वरित दुरुस्त न करणे आदी प्रकार सुरू आहेत. या कारवाईमुळे उसासह रब्बी पिके, फळबागा, भाजीपाला पिके अडचणीत आली आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे शेतकरी वर्गातून सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे.
सध्या कृषी पंपाच्या वीज बिलांच्या वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सक्ती करणार नाही, असे सरकारक़डून सांगण्यात येत असले तरी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारे वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे पाठपुरावा करीत आहेत. वीज बिलांच्या दुरुस्तीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
चौकट :
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित झालेले शेतकरी आता एकसंघ होऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. चुकीच्या पद्धतीने भरमसाठ दिलेली वीज बिले दुरुस्त करून द्या. वीज बिलांमध्ये सवलत द्या, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.