विटा : राज्यात सध्या कोरोनासारखी महामारी सुरू असताना महावितरणकडून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता वीज बिलाची थकबाकी वसुली करण्याची मोहीम सुरू आहे. ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणीची कारवाई केली जात आहे. ती तात्काळ थांबवावी. नाही तर तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा आ. अनिल बाबर यांनी शनिवारी महावितरणला दिला.
याबाबत त्यांनी महावितरणचे कोल्हापूरचे मुख्य अभियंता यांना लेखी पत्र दिले आहे.
आ. बाबर म्हणाले, ग्राहकांना वीज बिल वेळेत मिळत नाहीत. मिळाले तर एकत्रित दिले जात आहेत. त्यामुळे भरणा शक्य होत नाही. सध्या महावितरणकडून वीज वसुली करताना कोणतीही नोटीस न देता वीज कनेक्शन तोडणी सुरू केली आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना अर्वाच्य भाषा वापरली जात असल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील महावितरणकडून वीज तोडणीची सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवावी व सौजन्याने वीज बिलाची वसुली करावी. योग्य रीतीने वसुली केल्यास ग्राहकांचे सहकार्य मिळण्यासाठी आम्ही मदत करू; परंतु चुकीच्या पद्धतीने व जबरदस्तीने वसुली केल्यास विरोध करावा लागेल.