कोकरुड : मोहरे (ता. शिराळा) येथील ५०० मीटर पुराच्या पाण्यात टायर आणि दोरीच्या मदतीने जाऊन पणूब्रे वारुण येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येणपेपासून चांदोलीपर्यंतच्या ७० गावांमधील वीज पुरवठा अवघ्या दोन दिवसात सुरु केला. या कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे काैतुक हाेत आहे.
यावर्षी चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली. वारणा नदीला आजवरचा सर्वात मोठा पूर आला. पुराच्या पाण्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे गुरुवारी रात्री पणूब्रे वारुण येथील कार्यालयाने वीज खंडित केली. पुढील दोन दिवस आणखी पाऊस वाढल्याने पुराचे पाणी गावात शिरले. पणूब्रे वारुणच्या महावितरण कार्यालयातही पाणी शिरले. ग्रामस्थांचे हाल होऊ नयेत, यासाठी शाखा अभियंता अमोल भेडसगावकर यांनी २०१९ सालच्या अनुभवाच्या आधारे प्रदीप सावंत, ज्ञानदेव गायकवाड, आकाश पाटील या तीन कर्मचाऱ्यांना सोबत घेतले. मोहरे येथील ५०० मीटर पुरात गाडीचे तयार, कमरेला दोरी बांधून वाट काढत जनित्रापर्यंत पोहोचून अवघ्या काही मिनिटात ७० गावांचा वीज पुरवठा सुरु केला. यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचे पाणी, दळण-कांडणचा प्रश्न सुटला. तालुक्यात पहिल्यांदा पणूब्रे वारुण केंद्रातील गावे प्रकाशमय झाली. मंगळवारी उर्वरित सर्व गावांमधील वीजही सुरु झाली आहे. पुराचे पाणी असतानाही धाडसाने वीज पुरवठा सुरळीत करणारे पणूब्रे वारुण येथील शाखा अभियंता अमोल भेडसगावकर व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.