कोकरुड : दररोजचे येणारे वादळीवारे, गारांचा पाऊस आणि ढगांच्या गडगडासह होणाऱ्या अवकाळी पावसात खंडित झालेली वीजसेवा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून शिराळा तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. वादळीवाऱ्याने घरावरील छत उडून जाणे, कौले-पत्रे उडून जाणे, झाडे पडणे, फांद्या मोडून पडणे, त्याचबरोबर विजेचे खांब कोलमडणे, तारा तुटणे यासारख्या घटना दररोज घडत आहेत. अशा परिस्थितीतही महावितरणचे सर्व कर्मचारी उभ्या पावसात रात्रं-दिवस योद्ध्यासारखे काम करत आहेत. शक्य तितक्या वेगाने विद्युत प्रवाह सुरू करण्यासाठी राबत आहेत. अधिकारी वर्ग दोन-तीन कायम कामगार वगळता इतर हंगामी कामगारांना सोबत घेऊन ही अखंडित सेवा देण्याचे काम करत आहेत.
शिराळा पश्चिम भागात वादळीवाऱ्याने विजेचे खांब वाकणे, तारा तुटणे, तारेवर झाड पडणे यासारख्या घटना सातत्याने घडत असतात. या आठवड्यात वादळीवाऱ्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले असून शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. अशी माहिती पणूब्रे वारुण येथील महावितरण कार्यालयातील शाखा अभियंता अमोल भेडसगावकर यांनी दिली.