सांगली : वीज महावितरणच्या लाचखोर लाईनमन मयूर जयवंत साळुंखे (वय ४३) यास एक दिवसांची पोलस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विश्रामबाग येथील त्याच्या घरावर छापेही टाकल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.
तक्रारदार यांच्या राहत्या जागेत असलेला विद्युत खांब काढून देण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर शहर विभागातील लाईनमन मयूर साळुंखे हा तिथे आला. त्याने १६ हजारांच्या लाचेची मागणी केली. पहिल्या टप्प्यात दहा हजारांची लाच स्वीकारली. त्यानंतर उर्वरित सहा हजारांच्या रकमेची मागणी करत होता. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. पडताळणीत विद्युत पोल काढून देण्यासाठी चर्चेअंती साडेपाच हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले. साळुंखे याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.