खराडे म्हणाले की, तासगाव व नागेवाडी या दोन कारखान्यांनी ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. १५ जानेवारीपर्यंतची बिले दिलेली आहेत. मात्र त्यानंतर गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. गाळप होवून सहा महिने उलटून गेले आहेत. कायद्याने गाळपानंतर १४ दिवसात बिल देणे बंधनकारक असतानाही सहा महिने विलंब झाला आहे. या प्रश्नावर तीन आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी तारखा आणि आश्वासने देण्यात आली. पण ती पाळली नाहीत. २१ जून रोजी मोर्चा काढणार येण्यात होता. मात्र २० जूनरोजी व्यवस्थापक आर. डी. पाटील चर्चेसाठी आले. सांगलीत चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी धनादेश दाखविले आणि २१ जूनपासून बिल देण्यास प्रारंभ करत आहोत, त्यामुळे आंदोलन स्थगित करा, अशी विनंती केली. त्यामुळे आंदोलन स्थगित केले. मात्र महिना उलटून गेला तरी बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे २० जुलैपासून तासगाव मार्केट यार्डातील खासदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनास बसलेले शेतकरी तासगावात घरोघरी जाऊन भाकरी मागून गुजराण करतील, भीक मागतील मात्र बिल मिळाल्याशिवाय हटणार नाहीत, असा निर्धार करण्यात आला आहे.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजेंद्र माने, अशोक खाडे, दामाजी डुबल, गुलाबराव यादव, सचिन पाटील, भुजंग पाटील, संदेश पाटील, शशिकांत माने, महेश जगताप, संदीप शिरोटे, माणिक शिरोटे प्रयत्न करत असल्याचे खराडे यांनी सांगितले.