सांगली : अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुरड्याला रुग्णालयात सोडून मातेने पलायन केल्याने त्यांच्या नातेवाईकांनी चांगलीच तारांबळ उडाली. विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात आज (शनिवार) सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांसह नातेवाईकांनी कसून शोध मोहीम राबविल्याने अखेर ही माता माहेरी आई, वडिलांकडे सापडल्याने साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही महिला गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त आहे. विश्रामबाग परिसरातील एका खासगी रुग्णालयात ती औषधोपचार घेत आहेत. शनिवारी सकाळी ती नियमित तपासणीसाठी नातेवाईकांसोबत रुग्णालयात आली होती. तिथे तिने नातेवाईकांची नजर चुकवून आपल्या तीन महिन्याच्या चिमुरड्याला सोडून पलायन केले. बालक रडू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी मातेचा शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. शेवटी नातेवाईकांनी विश्रामबाग पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेऊन तपास सुरु ठेवला. शहरातील एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तिचा शोध घेण्यात आला. मात्र तिचा कोठेच सुगावा लागला नाही. शेवटी ती माहेरी आढळून आली. अखेर सापडलीनातेवाईकांसह पोलिसांनी ती माहेरी गेली असेल, असा संशय व्यक्त केला. त्यामुळे सर्वजण जयसिंगपूर येथील तिच्या माहेरी गेले. त्यावेळी ती तिथे सापडल्याने पोलिसांसह नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांचा जबाब घेऊन या प्रकरणावर पडदा टाकला. (प्रतिनिधी)
तीन महिन्यांच्या बालकास सोडून मातेने केले पलायन
By admin | Updated: June 8, 2014 00:43 IST