उमदी/उटगी : उमदी (ता. जत) येथील डॉ. रवींद्र हत्तळ्ळी याने रुग्ण म्हणून आलेल्या १९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला. घटनेनंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयावर हल्ला करून डॉक्टरला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर डॉक्टरला उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले. उमदी येथे गेल्या अनेक वर्षांपासून हत्तळ्ळी हे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. काल शुक्रवारी बालगाव (ता. जत) येथील पीडित विवाहिता नातेवाइकांबरोबर रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. त्यावेळी डॉ. हत्तळ्ळी याने तपासणीदरम्यान तिच्याशी अश्लील वर्तन केले. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डॉक्टरने तिच्या तोंडात साडीचा बोळा कोंबून घडलेला प्रकार सांगितला तर इंजेक्शन देऊन ठार मारण्याची धमकी दिली. तपासणी कक्षातून बाहेर आल्यानंतर तिने हा प्रकार नातेवाइकांना सांगितला. नातेवाईकांनी डॉक्टरला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थही रुग्णालयासमोर जमले. ग्रामस्थांनी व नातेवाइकांनी डॉक्टरला चोप दिला. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत डॉक्टरला मारहाण सुरूच होती. पोलिसांनी मध्यस्थी करून डॉक्टरला ताब्यात घेतले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. उमदीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीने मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)
डॉक्टरकडून रुग्ण महिलेचा विनयभंग
By admin | Updated: December 22, 2014 00:18 IST