संख : जत तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून अश्लील टोमणे मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने दोघांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशियत रसुलसाब चिनगीसाहेब येळापुरे (वय २८, रा. अंकलगी, ता. जत) व प्रवीण कलाप्पा कोळी (वय २२, रा. संख) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
संशयित रसुलसाब येळापुरे यांचे गॅरेज आहे, तर प्रवीण कोळी याचा चिकन ६५ चा गाडा आहे. संबंधित अल्पवयीन मुलीचा दाेघेही वारंवार पाठलाग करत. काही दिवसांपूर्वी दोघांनी तिला चिठ्ठी दिली हाेती. त्यानंतर २४ जून राेजी दुपारी अडीच वाजता मुलगी घरी असताना तिला फोन करून ‘तू आम्ही सांगतो त्याप्रमाणे ऐकायचे अन्यथा तुझ्या वडिलांना पळवून नेऊ’ अशी धमकी दिली.
मुलीने याची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर तिच्या आईने उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या आदेशाने अधिक तपास उपनिरीक्षक एस.एस. शिंदे करीत आहेत.