संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथे आराध्या प्रदीप दुपटे (वय ९) या बालिकेवर रविवारी दुपारी एक वाजता मोकाट कुत्र्याने हल्ला केला. यात तिच्या नाकाला जखम झाली. परिसरात अशा घटना वरंवार घडूनही महापालिका प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
संजयनगरमधील डॉ. लिमये रस्त्यावर आराध्या दुपटे ही घराजवळ समोर उभी होती. यावेळी मोकाट कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये ती जखमी झाली असून तिच्या नाकाला जखम झाली आहे. उपचारासाठी तिला सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिका आरोग्य विभागातील अप्पा शिकलगार यांच्याकडे नागरिकांनी संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रार केली होती; पण ते दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.