कडेगाव : साठ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनप्रवासात आमदार मोहनराव कदम यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी केलेले कार्य व लोकसेवा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी कदम यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने वांगी (ता. कडेगाव) येथे मावळते जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांचा एच. के. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महाराष्ट्र सहप्रभारी सोनल पटेल, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसकडे संख्याबळ कमी होते, तरीसुद्धा त्यांनी विजय मिळविला. तो विजय त्यांच्या कामाचा, परिश्रमाचा आणि जनसंपर्काचा होता. १९७८ साली काँग्रेसचे विभाजन झाले, त्यावेळी ते इंदिरा काँग्रेसचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य होते. डॉ. पतंगराव कदम आणि मोहनराव कदम या दोन भावंडांच्या प्रेमातून उभे राहिलेले काम आदर्शवत आहे.
प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, मोहनदादांनी बंधू पतंगरावांना समर्थपणे साथ देत आयुष्यातील जास्तीतजास्त वेळ संघटन कार्यासाठी व संस्थात्मक कामांसाठी दिला आहे. सहकार आणि राजकारण याचे योग्य संतुलन राखले.
विश्वजित कदम म्हणाले की, सहा दशके राजकीय व सामाजिक जीवनात केलेल्या कामाची पोचपावतीच आज दादांना मिळाली आहे. राजकारण सभ्यतेने कसे केले पाहिजे याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. कदम कुटुंबातील नव्या पिढीला त्यांच्या संस्कारांची शिदोरी लाभली आहे.
सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, बाळकृष्ण यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील आदी उपस्थित होते. आमदार विक्रम सावंत यांनी प्रास्ताविक केले. शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आभार मानले.
चौकट
तीन ‘व्ही’ आता एकसंध
आता विश्वजित कदम, विक्रम सावंत आणि मी विशाल पाटील असे तीन ‘व्ही’ एकसंधपणे काम करीत आहोत. ‘व्ही’ म्हणजे ‘व्हिक्टरी’ (विजय) असे पुढील वाटचालीचे संकेत विशाल पाटील यांनी दिले. यावर विश्वजित कदम यांनीही विशाल पाटील यांचा उल्लेख करून सांगितले की, नक्कीच १९९९ ची पुनरावृत्ती २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसेल.
चौकट
देश व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्ता द्या : नाना पटोले
सध्या देशात जे लोक सत्तेवर आहेत, ते संविधानाचा भंग करीत देश विकायला निघाले आहेत. महागाई वाढली आहे. त्यामुळे देश आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या. २०२४ मध्ये देशाची व राज्याची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात द्या, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.