---------------------
विवाहितेस मारहाण; पती व सासऱ्याविरुद्ध गुन्हा
मिरज : घरात राहायचे नाही, असे म्हणत विवाहितेस पती व सासऱ्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत स्मिता अनिल आळते यांनी पती अनिल बाळासाहेब आळते (वय ४०, मालगाव रोड, मिरज) व सासरे बाळासाहेब आण्णासाहेब आळते (६०, रा. ढवळी, ता. मिरज) या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
स्मिता आळते यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. त्यांना पती व सासऱ्याने आमच्या घरात राहायचे नाही, आमच्या दुकानगाळ्यात ब्युटीपार्लरचा व्यवसाय करायचा नाही, असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. याबाबत मिरज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
--------------
भावाला ठार मारण्याची धमकी; एकाविरुद्ध गुन्हा
मिरज : घराची जागा विकून पैसे दे. नाहीतर कोयत्याने ठार मारीन. अशी धमकी दिल्याबद्दल गोविंद अंकुश नाईक यांनी भाऊ चंद्रकांत अंकुश नाईक (वय ३५, रा. भारतनगर, मिरज) याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
गोविंद नाईक हे शनिवारी सकाळी रिक्षा घेऊन महात्मा गांधी चौकात थांबले असताना तेथे चंद्रकांत दारूच्या नशेत कोयता घेऊन आला. त्याने गोविंद यास ‘राहत असलेल्या घराची जागा विकून मला पैसे दे, नाहीतर कोयत्याने तूला मारीन’ असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.
------------
तरुणास धमकावत २० हजाराची लूट; चार जणांविरुद्ध गुन्हा
मिरज : लग्नाचा विषय मिटविण्यासाठी चर्चेस बोलावून २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्याबद्दल महेश रमाकांत पोतदार (रा. सातारा) यांनी अन्नपूर्णा पोतदार, कमल पोतदार, गौरव पोतदार, प्रमोद पोतदार (रा. उपळावी, ता. तासगाव) यांच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
महेश पोतदार यांना लग्नाचा विषय मिटविण्यासाठी उपळावी येथे बोलावून घेतले. त्यावेळी अन्नपूर्णा पोतदार व इतरांनी धमकावून एक तोळ्याची सोन्याची चेन, रोख १ हजार ५०० रुपये असा एकूण २० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.