मिरज : मिरजेतील रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोबाइल व लॅपटॉप चोरणाऱ्या भगवान दत्ता माने (वय २३, रा. कैकाडी गल्ली, गांधी चौक, मिरज) या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लॅपटॉप व चार मोबाइल असा ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हा अन्वेषण व रेल्वे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
मिरजेत कैकाडी गल्लीतील भगवान माने याने रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या साहित्याची चोरी केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी पुजारी चौकात त्यास पकडले. त्याच्याजवळ ५० हजार रुपये किमतीचा व दहा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, पंधरा हजार रुपयांचा मोबाइल, दहा हजारांचा मोबाइल व एक पाच हजारांचा मोबाइल असा ९० हजार रुपयांचा चोरीचा ऐवज सापडला.
पोलिसांच्या चाैकशीत माने याने पहाटेच्या सुमारास मिरज रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोबाइल व लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. माने यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.