समितीचे अध्यक्ष जावेद पटेल म्हणाले, रस्त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे जाहीर करून पोस्टरबाजी करणाऱ्या आमदार सुरेश खाडे यांनी मिरजकरांची फसवणूक केली आहे. खासदार संजयकाका पाटील याकडे लक्ष देत नाहीत. शहरातील या प्रमुख रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मिरजकर त्रस्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या रुंदीकरणाचे ८० टक्के काम आठ वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग परस्परांकडे बोट दाखवित आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. काहींना अपंगत्व आले, मात्र, प्रशासन निद्रिस्त आहे. शंभर कोटी खर्चाच्या या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे या मागणीसाठी सुधार समिती लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर आंदोलन करून त्यांना जाब विचारणार आहे. २७ मेपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास सुधार समितीचे कार्यकर्ते केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिनी २७ मे रोजी गांधी चौकात सामूहिक आत्मदहन करणार असल्याचाही इशारा देण्यात आला. यावेळी अॅड. ए. ए. काझी, गीतांजली पाटील, बाळासाहेब पाटील, मुस्तफा बुजरूक, असिफ निपाणीकर, जहीर मुजावर, झोहेब मुल्ला, सचिन गाडवे उपस्थित होते.
मिरजेत छत्रपती शिवाजी रस्त्यासाठी सुधार समितीचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:27 IST