मालगाव : मिरज तालुक्यात अहवालानुसार ७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत तर १४ गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी हाेत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
मिरज तालुक्यात ६४ गावे आहेत. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक गावात संसर्ग वाढीस लागल्याने तालुका प्रशासनापुढे माेठे आव्हान निर्माण झाले हाेते. तहसीलदार डी. एस. कुंभार व गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी उपाय योजनांसाठी तातडीने पाऊले उचलत तालुक्यात प्रबोधनासाठी दौरे केले. गावनिहाय बैठका घेऊन सुरक्षिततेबाबत प्रबोधन केले. विलगीकरण कक्षात संशयित रुग्णांना दाखल करण्याची सक्ती करण्याबरोबर आपत्ती व्यवस्थापन समितीला इतर विशेष अधिकार दिले. याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. अनेक गावात कोरोनाला अटकाव होत असल्याचे चित्र आहे. सूचनेप्रमाणे दक्षता समितीनेही मास्क वापरण्याची तसेच संशयितांना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल होण्याची सक्ती केली. रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होऊ लागल्याने कोरोनाने वेढलेली ७ गावे कोरोनामुक्त झाली. आणखी १४ गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
चौकट
ही गावे कोरोनामुक्त
तालुक्यात बोलवाड, जानराववाडी, करोली, लक्ष्मीवाडी, बामणी, व्यंकोचीवाडी, नावरसवाडी ही सात गावे कोरोनामुक्त झाली आहेत. रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने गावात एकही कोरोना रूग्ण नाही.
चौकट
या गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
तालुक्यातील गुंडेवाडी, कदमवाडी, काकडवाडी, कानडवाडी, खोतवाडी, लिंगनूर, मानमोडी, पद्माळे, पाटगाव, पायाप्पाचीवाडी, रसुलवाडी, सांबरवाडी, शिंदेवाडी व जुनी धामणी या गावात कोरोना रुग्णांची संख्या पाचपर्यंत आल्याने या चौदा गावांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे.
चौकट
अन्य गावातही कडक उपाययोजना
तहसीलदार डी. एस. कुंभार व आपण कोरोना रोखण्यासाठी आजही तालुका दौरे करीत आहे. प्रबोधन व कडक उपाययोजनेचा चांगला परिणाम होत आहे. अधिक रुग्णसंख्या असलेल्या गावात कोरोना हटविण्यासाठी कडक उपाययोजना राबविली जाईल, असे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी सांगितले.