याबाबत प्रथमेश विजयसिंह घाडगे यांनी कुणाल व गौतम कांबळे (दोघे रा. म्हाडा कॉलनी, मिरज) यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील चौकात प्रथमेश घाडगे यांचे कापड व चप्पल दुकान आहे. कुणाल व गौतम या दोघांनी रविवारी रात्री दुकानात येऊन प्रथमेश यांना चाकूचा धाक दाखवत दुकानातून सॅण्डल घेतले. ‘दुकान व्यवस्थित चालवायचे असेल तर आम्हाला दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुम्हाला जड जाईल.’ असे धमकावले. घाडगे यांच्या बाजूच्या दुकानातही दोघांनी चाकूचा धाक दाखवत साहित्य घेतले. नशेखाेर तरुणांच्या या कृत्यामुळे संतप्त जमावाने त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत प्रथमेश घाडगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात धुमाकूळ घालणारे नशेखोर आता शहरातही चाकूच्या धाकाने लूटमार करीत असल्याने दहशत निर्माण झाली आहे.
मिरजेत नशेखोरांचा पुन्हा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST