फाेटाे : २७ हर्षदीप चाैगुले
मिरज : मिरजेत नशेखोर तरुणांचा उपद्रव सुरूच असून, शुक्रवारी कृष्णाघाट रस्त्यावर डंपर अडवून दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी हर्षदीप विकास चौगुले (वय २२) या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिरजेत रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात दारू व गांजाची नशा करणाऱ्यांकडून मारामारी, खंडणी, चाकूचा धाक दाखवून पैसे उकळणे, असे गुन्हे वारंवार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी दारू व गांजाची नशा करून बेळगाव रेल्वे गेटवर हर्षदीप चौगुले याने रस्त्यावर वाहने अडवून त्यावर दगडफेक केली. त्या रस्त्यावरून मुरूम भरून जाणारा महामार्ग ठेकेदाराचा डंपर अडवून डंपरच्या काचा दगडाने फोडल्या. दगडफेकीत डंपरचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले. यावेळी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर व नागरिकांवर दगडफेक करण्यांत आल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गांधी चाैक पोलिसांनी हर्षदीप चौगुले यास ताब्यात घेतले.