लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेत एकास शिवीगाळ करून त्याच्या खिशातील पैसे काढून घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. तरबेज अहमद शेख (रा. ख्वॉजा झोपडपट्टी, शिवाजी रोड, मिरज), असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जबरी चोऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एलसीबीचे पथक मिरज विभागात गस्तीवर होते. यावेळी मिरज बसस्थानक ते रेल्वेस्थानक मार्गावर एक जण संशयास्पदरीत्या फिरताना पथकाला आढळून आला. त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने मेहबूब अब्दुलहमीद खतीब याच्याशी चहा देण्यावरून भांडण झाल्याचे व यावेळी खतीबला मारहाण करून खिशातील पैसे काढून घेतल्याचे कबुली त्याने दिली. खतीब याने पोलिसांत तक्रार दिल्याने संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पकडण्यात आले. महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.