सांगली : तुंग (ता. मिरज) येथे अल्पवयीन मुलीस अश्लील चित्रफीत दाखवत तिच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.१ डी. पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. दरम्यान, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम नवीन कायदा दुरुस्तीनुसार चाललेला राज्यातील पहिला गुन्हा, तर शिक्षा झालेली देशातील पहिलीच घटना ठरली आहे.
गेल्यावर्षी तुंगमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याची वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण करत अल्पवयीन आरोपीस शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
खटल्याची हकिकत अशी की, तुंगजवळील एका भागातील अल्पवयीन मुलगी २० मे २०२० रोजी सायंकाळी सातपासून बेपत्ता झाली होती. रात्रभर शोध घेऊनही ती सापडली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा शोध सुरू करण्यात आला होता. हाळभाग परिसरात एका शेतात तिचा मृतदेह सापडला होता. तिच्या डोक्यात जखमा होत्या, तर तिचा पायजमा गळ्याभोवती गुंडाळलेला होता.
याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीस उसाच्या शेतात नेऊन मोबाईलवर तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी रडू लागल्याने तिला खाली पाडून संशयिताने हाताने तिचा गळा आवळला. त्यानंतरही तिची हालचाल होत असल्याने त्याने तिचा पायजमा काढून गळ्याभोवती आवळून मानेवर पाय ठेवून जाेरात आवळला होता. तिची हालचाल बंद झाल्याची खात्री पटल्यानंतर तो पळून गेला होता.
जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ डी. पी. सातवळेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख काम पाहिले. सरकार पक्षातर्फे पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. पंच, साक्षीदारांसह तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे व दंड न भरल्यास तीन वर्षे व बालन्याय अधिनियमानुसार तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. बाल न्याय अधिनियमानुसार विशेष न्यायालय म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.१ सातवळेकर यांनी अत्यंत गोपनीयरित्या आरोपीच्या घरातील जबाबदार व्यक्तीसमोर केस चालवली. खटला सुरू झाल्यापासून तीन महिन्यात निकाली काढला गेला, तर गुन्हा घडल्यापासून वर्षाच्या आत निकाल लागला.
चौकट
कायदा दुरुस्तीनंतर पहिलाच निकाल
गुन्हा घडला यावेळी आरोपीचे वय १६ वर्षे ८ महिने होते. आरोपी अज्ञान असल्याने बाल न्याय अधिनियमाच्या कायद्यातील दुरुस्तीनुसार गुन्हा क्रूरतेचा असल्याने विशेष न्यायालयात चालला. नवीन कायदा दुरुस्तीनुसार राज्यातील पहिलाच हा गुन्हा चालला तर आरोपीस शिक्षा झालेली संपूर्ण देशातील पहिलीच घटना ठरली आहे.