सांगली : शहरातील दुकाने गुरुवारपासून सुरू करण्याची घोषणा व्यापारी संघटनेने केली होती. त्याला काही संघटनांनी विरोध केला. त्यात व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताच महापालिका व पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे गुरुवारी बाजारपेठेत काहीकाळ तणावाची स्थिती होती. यानिमित्ताने व्यापारी संघटनांतील मतभेद समोर आले.
कोरोनामुळे गेले तीन महिने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. मध्यंतरी दहा दिवस दुकाने उघडली होती. त्यानंतर पुन्हा शटर डाऊन करण्यात आले. शहरातील कोरोना पाॅझिटिव्हिटी दर कमी असल्याने दुकाने सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. पण त्यातही प्रशासनाकडून लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, यावर व्यापारी संघटनांचे एकमत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड व्यापारी महासंघाने गुरुवारपासून दुकाने उघडणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत वर्दळ वाढली होती. काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली, पण पोलीस व महापालिकेच्या पथकाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यातून प्रशासन व व्यापाऱ्यांत वादही झाला. राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक शेखर माने यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच पोलिसांनाही कारवाई करू नये, यासाठी शिष्टाई केली.
दरम्यान, व्यापारी एकता असोसिएशननेही दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. संघटनेशी संलग्न व्यापाऱ्यांचा या निर्णयाशी संबंध नसल्याचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले. त्यामुळे दुकाने सुरू करण्यावरून व्यापाऱ्यांत मतभेद असल्याचे दिसून आले.
चौकट
दुकाने उघडण्याचा मेसेज चुकीचा : समीर शहा
शहरातील दुकाने उघडण्याचा संदेश चुकीचा असून त्याच्याशी व्यापारी एकता असोसिएशनचा संबंध नाही. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. यात १२ जुलैपर्यंत जिल्हा तिसऱ्या स्तरात आणून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करून प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली होती. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहोत. दुर्दैवाने सोमवारपासून दुकानांना परवानगी न दिल्यास आम्ही दुकाने सुरू करणार आहोत, असे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले.