कडेगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची चिंचणी (ता. कडेगाव) येथील मतदान केंद्रावर भेट झाली. या भेटीची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, ही भेट केवळ योगायोग होता, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले.
निवडणुकीत रयत पॅनेलच्या प्रचाराची धुरा सांभाळलेल्या डॉ. विश्वजित कदम यांनी सकाळी चिंचणी येथील मतदान केंद्रास भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे सहकार पॅनेलच्या बूथजवळ कार्यकर्त्यांशी चर्चा करत थांबले होते. दरम्यान, विश्वजित कदम यांचा ताफा बूथजवळ आल्या आणि दोन्ही परस्परविरोधी नेत्यांची योगायोगाने भेट झाली. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. निवडणूक जोरात व रंगतदार असल्याची दोघांमध्ये कार्यकर्त्यांसमक्ष चर्चा झाली. दोघांनी हसत-खेळत एकमेकांना दाद दिली. कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये दोघांचे फोटो घेतले. ‘सारे काही मतदारांच्या हातात आहे’, असं म्हणत दोघांनी हसतमुखाने एकमेकांशी संवाद साधला. ‘कोरोनात सर्वांनी काळजी घ्या,’ असाही सल्ला देऊन विश्वजित कदम कराड तालुका दौऱ्यावर निघून गेले.
त्यानंतर पृथ्वीराज देशमुख यांनी चिंचणी येथील मतदान केंद्रास भेट दिली आणि तेही पुढील दौऱ्यासाठी निघून गेले. दोन्ही नेते खिलाडूवृत्तीने निवडणुकांना सामोरे जातात हा याचा अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आला. यावेळी घाटमाथ्यावरच्या राजकीय संस्कृतीचे दर्शनही उपस्थितांना झाले. सहकार व रयत पॅनेलच्या कार्यकर्त्यांसह सर्वत्र या दोन्ही नेत्यांमधील भेटीची चर्चा होती.
फोटो : २९ कडेगाव २
ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथील बुथवर राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची भेट झाली.