नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील हॉटेल दत्त भुवनजवळ महामार्गावर माेटारीचा टायर फुटून चालकासह महिला ठार झाली. पुणे येथे मुलगी पाहण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. श्रीकांत अण्णाप्पा कुंभार (वय ५०, रा. अंकली, ता. मिरज) व स्वप्नाली प्रमोद कुंभार (३५, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.
अंकली (ता. मिरज) येथील कुंभार कुटुंबातील ११ जण मुलगी पाहण्यासाठी माेटारीतून (क्र. एमएच १० बीए ६३९७) आशियाई महामार्गावरून पुण्याकडे निघाले हाेते. नेर्ले येथील हॉटेल दत्त भुवनपासून काही अंतर पुढे आल्यानंतर अचानक गाडीच्या पुढील बाजूचा टायर फुटला. वेग जास्त असल्याने माेटार महामार्गावरील दुभाजकावर जाऊन आदळली. त्याही स्थितीत चालक श्रीकांत कुंभार यांनी माेटारीला सावरत, रस्त्यावरून बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा ताबा सुटल्याने माेटार महामार्गावरून भरकटत जाऊन उलटून सेवारस्त्याच्या खालील ओढ्याच्या भरावावर जाऊन पडली. आसपासच्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढून इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात पाठवून दिले.
अपघातात चालक श्रीकांत कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला तर स्वप्नाली प्रमोद कुंभार यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात पंकज सुनील कुंभार (वय २९), सुरेखा सुनील कुंभार (४२), सुनील मल्लाप्पा कुंभार (५२), प्रकाश मल्लापा कुंभार (४०), अरुण मल्लाप्पा कुंभार (४०), गीतांजली अरुण कुंभार (३८), नीलम श्रीकांत कुंभार (३६, सर्व रा. कुंभार गल्ली, अंकली, ता. मिरज), मयूर प्रमोद कुंभार (१२, रा. इचलकरंजी) व सदाशिव मारुती कुंभार (५६, रा. बेडकीहाळ, ता. चिक्कोडी) जखमी झाले.
कासेगाव पाेलीस ठाण्यात अपघाताची नाेंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
फोटो -२२०१२०२१-आयएसएलएम-नेर्ले अपघात न्यूज