इस्लामपूर : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शालेय विद्यार्थिनींच्या छेडछाड प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटल्यानंतर, रविवारी दिवसभर अनेक राजकीय नेते, महिला आयोगाच्या अध्यक्षा, ‘भूमाता’च्या तृप्ती देसाई, मेघा पानसरे आदींनी पीडित मुलींची विचारपूस करुन त्यांना धीर दिला. छेडछाडीच्या या घटनांचा सर्वांनी निषेध केला. तृप्ती देसाई यांनी, घटनेची चौकशी करावी, अशी मागणी करुन, पोलिसांना या छेडछाडीच्या घटना थांबवता येत नसतील, तर भूमाता बिग्रेडच्या कार्यकर्त्या मुलींचे संरक्षण करतील, असा इशाराही दिला.मसुचीवाडीतील मुलींची बोरगावातील गावगुंडांकडून छेडछाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर या मुली दहशतीच्या वातावरणाखाली वावरत होत्या. बोरगावातील गुंड या मुलींच्या घरापर्यंत पाठलाग करीत जात होते. या सर्व प्रकाराची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यावर त्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन बोरगावमधील शाळांमधील मुलींचे प्रवेश रद्द करुन त्यांना इतर ठिकाणी शिकण्यासाठी पाठवायचे ठरविले. तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव केला. याची माहिती वृत्तपत्रांतून प्रसिध्द झाल्यानंतर या छेडछाडीच्या गंभीर घटनेचे वास्तव समोर आले. पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा मसुचीवाडी येथे तळ ठोकून होती. सायंकाळी जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी यांनी इस्लामपूर येथे येऊन तपासाची माहिती घेतली.यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर यांनी, या छेडछाडीसंदर्भात जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा करुन गुंडांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला-मुली सुरक्षिततेच्या वातावरणात राहतील याची दक्षताही पोलिसांनी घ्यावी. सुरक्षेच्यादृष्टीने मुलींना स्वतंत्र बस व्यवस्था, आवश्यकता भासली तर पोलिस संरक्षण दिले जाईल. शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे गावात मुलींसाठी महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली आहे, असे सांगितले.डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, मुलींना दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मुलींना सक्षम करण्यासाठी शिबिरे घेण्यात येतील. पोलिसांनी यातील संशयितांवर कारवाई करावी. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी रविवारी दुपारी मसुचीवाडी गावास भेट देऊन ‘काळजी करू नका, मी पोलिसांच्या संपर्कात आहे. काही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. जे बाहेर आहेत, त्यांनाही अटक केली जाईल़ यामध्ये जे-जे दोषी असतील त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत़ मी आपल्या पाठीशी आहे. संबंधित गुंडांना तडीपार करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, अशा शब्दात मसुचीवाडी ग्रामस्थांना धीर दिला.याप्रसंगी माजी सरपंच सर्जेराव कदम, माजी पं़ स़ सदस्य दत्तू रत्तू खोत, सरपंच सुहास कदम, उपसरपंच संभाजी कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष हौसेराव नांगरे-पाटील, सोसायटीचे अध्यक्ष संजय कदम, दादासाहेब कदम, प्रशांत कदम, राजाराम माने व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)नेत्यांची भेट : कारवाईच्या सूचनादिवसभरात आमदार जयंत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पीडित मुलींच्या कुटुंबियांना धीर देत ग्रामस्थांसह पोलिस ठाण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या. रविवारी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, सदाभाऊ खोत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, भाजपच्या उपाध्यक्षा नीता केळकर, भारती दिगडे, पिंपरी-चिंचवडच्या उमा खापरे, डॉ. मेघा पानसरे अशा मान्यवरांनी मसुचीवाडीत भेट देऊन पीडित मुली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली.तृप्ती देसार्इंकडून आंदोलनाचा इशाराबोरगाव : मसुचीवाडीसारख्या खेडेगावातील मुली, महिला सुरक्षित नाहीत. तर पुणे, मुंबईसारख्या शहरातील महिला कशा सुरक्षित राहू शकतात. खुर्चीला चिकटून बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते सोडावे. ते या पदासाठी सक्षम नाहीत, असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला. मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शालेय मुलींच्या छेडछाडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर देसाई यांनी रविवारी मसुचीवाडी गावात धाव घेतली. मसुचीवाडी येथील शालेय मुली व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्या बोरगाव येथील ग्रामसभेलाही उपस्थित होत्या.देसाई म्हणाल्या, बोरगाव येथील घटना निंदनीय असून, या मुलींना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत भूमाता ब्रिगेड त्यांच्या पाठीशी ठामपणे असेल. वेळप्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करू. भूमाता ब्रिगेड ही संघटना कोणत्याही पक्षाशी अथवा राजकीयांशी संलग्न नाही. आम्ही महिलांच्या न्याय्य हक्क तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शेवटपर्यंत लढा देऊ. आज यातील मुख्य संशयित फरारी आरोपी राजेंद्र पवार याला पोलिसांनी ताब्यात न घेतल्यास सोमवारी सकाळी भूमाता ब्रिगेड व मसुचीवाडीतील महिला पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करतील. यावेळी सरपंच प्रकाश वाटेगावकर, उपसरपंच विकास पाटील, कार्तिक पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष माणिक पाटील, रणधीर पाटील, एस. टी. पाटील, ए. पी. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
‘मसुचीवाडी’चे पडसाद राज्यभर
By admin | Updated: May 9, 2016 00:36 IST