वाळवा : ‘हुतात्मा’ने दिलेला उसाचा दर देशात प्रथम क्रमांकाचा आहे. शेजारील ‘राजारामबापू’पेक्षा १६३ रुपये, तर कृष्णा कारखान्यापेक्षा ४२२ रुपये जादा दर ‘हुतात्मा’ने दिला आहे. ऊस हंगाम दोन वर्षे अडचणीत असताना, राज्यात, देशात, जगातच साखर उत्पादन वाढले असताना, बाजारात साखरेचे दर १८०० ते १९०० रुपये असताना, केवळ साखर या एकमेव उत्पादनावर ‘हुतात्मा’ने हा उच्चांकी दर दिला आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी शुक्रवारी केले. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. सभेपूर्वी बॅँक आॅफ इंडिया इस्लामपूर शाखेच्या सहायक महाप्रबंधक सुलभा राठोड, उपाध्यक्षा वंदना माने, नीलावती माळी, संचालिका सुनीता माळी आणि क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या कन्या विशाखा कदम यांच्याहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याहस्तेही बॉयलर प्रदीपन करण्यात आले. नायकवडी म्हणाले की, कारखान्यास उसाची उपलब्धता आहे. सर्वात जास्त उसाची नोंद झाली आहे. यावर्षीचे गाळपसुद्धा आर्थिक अडचणींवर मात करूनच करावे लागेल. ‘हुतात्मा’मध्ये ‘व्यक्ती महत्त्वाची नसून सृष्टी महत्त्वाची’ आहे. मराठवाड्यातील बरेच कारखाने सुरू होणार नाहीत. ‘हुतात्मा’ने १५ आॅक्टोबरला हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. पावसाचा अडथळा आल्यास आॅक्टोबर अखेर कारखाना सुरू होईल. या हंगामात ७ लाख २० हजार टन उसाचे गाळप करून, १३.५० टक्के उतारा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस यांनी स्वागत केले. यावेळी सरपंच गौरव नायकवडी, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, बॅँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, शिवाजी सापकर, यशवंत बाबर, बाळासाहेब पाटील, गंगाराम सूर्यवंशी, जयवंत अहिर, महादेव कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)
‘हुतात्मा’ शंभर रुपये जादा दर देणार
By admin | Updated: October 2, 2015 23:43 IST