सांगली : संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या वारणानगर येथील नऊ कोटी रुपये चाेरीतील मुख्य संशयित मैनुद्दीन उर्फ राजा अबुबकर मुल्ला याचा आर्थिक व्यवहारातूनच खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच्याशी अर्थिक व्यवहार करणारे संशयित हल्लेखोर पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. लवकरच संशयितांना अटक केली जाईल, असे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील गणेशनगरमध्ये मु्ल्ला आला होता. याचवेळी संशयितांनी हातात हत्यार घेऊन पाठलाग सुरू केला. जीव वाचविण्यासाठी मुल्ला पळत एका इमारतीमध्ये शिरला. तिथे त्याने बंद दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला तरीही हल्लेखोरांनी त्यास गाठत कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करून खून केला होता. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अजय सिंदकर, अनिल तनपुरे यांच्यासह पथक दाखल होत त्यांनी तपासाची चक्रे फिरवत शोध सुरू केला होता. त्यानुसार आर्थिक कारणानेच त्याचा काटा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वारणानगर प्रकरणातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो कुटुंबीयांसह विजयनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये राहण्यास होता. त्याचबरोबर कुपवाडमध्ये त्याने क्लब सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी कारवाई केल्याने त्याने सांगलीत क्लब सुरू करण्यासाठी जागेचा शोध सुरू केला होता. यामध्ये आर्थिक कारणावरून संशयिताचे बिनसल्याने त्याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यातील संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
मुल्ला हा वारणानगर येथील तीन कोटी रुपये चोरी प्रकरणातील मुख्य संशयित होता. त्यास अटक केल्यानंतर पोलीस त्यास वारणानगरला घेऊन गेले होते व पोलीस पथकानेच तेथील सहा कोटी रुपये लंपास केल्याची तक्रार कोडोली पोलिसांत करण्यात आली होती.