कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करून ८७ रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल डॉ. महेश जाधव सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात गेले महिनाभर कारागृहात आहे. याप्रकरणी आतापर्यंत पंधरा जणांना अटक झाली आहे. न्यायालयाने यापूर्वी पाच जणांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आता या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराच्या जामिनावर सत्र न्यायालयात निर्णय होणार आहे.
मिरजेत सांगली रस्त्यावर ॲपेक्स कोविड केअर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत २०५ पैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात अपुरी साधनसामग्री, सुविधांचा अभाव, जादा बिल आकारणी, रुग्णांना बिले न देणे, पात्र डॉक्टरांची कागदोपत्री नियुक्ती, उपचारात हलगर्जीपणा, यामुळे ८७ कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी डॉ. महेश जाधव याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गांधी चौक पोलिसांनी रुग्णालय चालक डॉ. महेश जाधव यास दि. १८ जून रोजी अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी त्याचा भाऊ डॉ. मदन जाधव, परिचारिका, रुग्णालय कर्मचाऱ्यांसह कमिशनवर रुग्ण आणणारे रुग्णवाहिका चालक, अशा पंधरा जणांना अटक झाली आहे. यापैकी दहा संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस तपास सुरू असल्याने व काही आरोपी अद्याप फरार असल्याने डाॅ. जाधव याला जामीन देण्यास पोलिसांनी विरोध केला आहे. मंगळवारी डॉ. महेश जाधव याच्या जामिनावर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
डॉ. शैलेश बरफे अद्याप फरार
ॲपेक्स प्रकरणात डॉ. महेश जाधव याला मदत केल्याबद्दल गुन्हा दाखल असलेला डॉ. शैलेश बरफे हा अद्याप फरार आहे. जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने डाॅ. बरफे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. गांधी चौकी पोलिसांकडून डॉ. बरफे याचा शोध सुरू आहे.