पेठनाका येथे कृष्णा उद्योग समूहाचे नेते डॉ. अतुल भाेसले यांनी वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राहुल महाडिक, सम्राट महाडिक, जगन्नाथ माळी, शंकर पाटील, वैभव जाखले उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या विजयात महाडिक बंधूंचा मोलाचा वाटा आहे, अशी भावना कृष्णा उद्योग समूहाचे नेते डॉ. अतुल भाेसले यांनी व्यक्त केली.
पेठनाका येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेला अतुल भाेसले यांनी अभिवादन केले. कृष्णा कारखान्यावर एकमुखी सत्ता आणल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल महाडिक व महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक यांच्या हस्ते डॉ. अतुल भाेसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती जगन्नाथ आण्णा माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाेसले म्हणाले, महाडिक बंधूंकडे भाजपची राज्य पातळीवरील प्रमुख पदे आहेत. या पदाचा त्यांनी पक्षवाढीसाठी उपयोग केला आहे. राहुल व सम्राट महाडिक यांनी गावोगावी जाऊन भाजप पक्ष रुजवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत, त्यात ते यशस्वी झाले आहेत. यावेळी भाेसले यांनी वाळवा-शिराळा विधानसभा मतदार संघातील अडीअडचणी जाणून घेतल्या. या भागातील अर्धवट राहिलेली विकासकामे भाजपच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी उपसरपंच शंकर पाटील, वैभव जाखले, राजेंद्र पाटसुते, हर्षवर्धन पाटील, सरगम मुल्ला, जयवंत वीरकर, इंद्रजित पाटील उपस्थित होते.